नाशकात भाजपा कार्यकर्त्यांचा राडा, पैसे घेऊन तिकीट वाटल्याचा आरोप; महाजन म्हणाले, "चौकशी करू..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 15:20 IST2025-12-30T15:19:36+5:302025-12-30T15:20:39+5:30
काही निर्णय ऐनवेळी बदलू शकतात मात्र मनासारखे झाले नाही म्हणून अंगावर यायचे, हातघाई करायची हे योग्य नाही. ही बाब प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालेन असं महाजन यांनी सांगितले.

नाशकात भाजपा कार्यकर्त्यांचा राडा, पैसे घेऊन तिकीट वाटल्याचा आरोप; महाजन म्हणाले, "चौकशी करू..."
नाशिक - महापालिकेत १२२ जागा आहेत आणि इच्छुकांची संख्या हजारात आहे. त्यामुळे काही ठिकाणी नाराजी होणारच आहे. तिकीट न मिळाल्याने काही कार्यकर्ते नाराज होतात. ८० टक्के जुने लोक आहेत त्यांनाच तिकीट दिली आहे. नाशिकमध्ये जे झाले ते चुकीचे आहे. अनेक इच्छुक उमेदवार होते. त्यामुळे अनेकांना तिकीट हवं असे वाटत होते. त्यात एबी फॉर्म वाटप जिथे सुरू होते तिथे १००-१५० कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. सगळ्यांना पक्षाचे तिकिट हवे असते परंतु जागा कमी आणि इच्छुकांची संख्या जास्त असल्याने हा गोंधळ झाला असं सांगत याची चौकशी करू असं विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
नाशिक भाजपा कार्यकर्त्यांच्या राड्याप्रकरणी गिरीश महाजन म्हणाले की, एबी फॉर्म देताना हे घडणे चुकीचे होते. कार्यकर्त्यांनी जो गोंधळ घातला तो अयोग्य होता. या कार्यकर्त्यांना कुणी खतपणी घातले याची चौकशी करून कारवाई करू. १२२ तिकीटे आहेत, सगळ्याच कार्यकर्त्यांना तिकीट मिळत नाही. त्यात काही नवीन आलेले लोक आहेत त्यांनाही डावलता येत नाही. ते अपेक्षेने पक्षात आले होते. त्यामुळे हातघाईवर येणे हा प्रकार दुर्दैवी आहे. मी ८ दिवसांपासून नाशिकमध्ये आहे. सगळ्यांशी बोलणे झाले, चर्चा करून निर्णय घेतलेत. काही निर्णय ऐनवेळी बदलू शकतात मात्र मनासारखे झाले नाही म्हणून अंगावर यायचे, हातघाई करायची हे योग्य नाही. ही बाब प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालेन असं त्यांनी सांगितले.
तसेच तिकीट वाटपात कुठेही आर्थिक व्यवहार झाला नाही. जर कुणी असा आरोप करत असेल तर त्याची चौकशी केली जाईल. १ कोटी असो वा ५ लाख कुणाकडे माहिती असेल तर त्यांनी द्यावी. ज्यांना तिकीट मिळाले त्यांनाही तुम्ही कुणाला पैसे दिलेत का अशी विचारणा करू. कुणी तुमच्याकडे पैसे मागितले का असं विचारू. याची सखोल चौकशी झाली पाहिजे. उगाच विनाकारण कुणी हवेत आरोपांचे गोळीबार करू नयेत असं सांगत मंत्री गिरीश महाजन यांनी संतप्त भाजपा कार्यकर्त्यांनी केलेल्या आरोपावर भाष्य केले आहे.
दरम्यान, तिकीट कापले गेलेत म्हणून आरोप होणार आहेत. आमच्याकडे तिकिटांची मागणी खूप आहे. त्यात तिकीट मिळाले नाही म्हणून पैशांचा आरोप करायचा हे सर्रास बघायला मिळतेय. परंतु यावर नक्कीच चौकशी केली जाईल. बाहेरून अनेक लोक आपल्या पक्षात आले आहेत परंतु आपण जुन्या लोकांना उमेदवारीत मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले आहे. आता बाहेरच्या पक्षातील काही मोठे पदाधिकारी आपल्याकडे आले आहेत. त्यांनाही थोडेफार आपल्याला द्यावे लागेल. ८० टक्के जुनेच लोक आहेत. २० टक्के नवीन लोक आहेत. पक्षाने ३-३ सर्व्हे केले आहेत. ते बघूनच जिंकून येण्याची क्षमता असणाऱ्यांना उमेदवारी दिली आहे असंही गिरीश महाजन यांनी म्हटलं.