"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 13:35 IST2025-12-26T13:34:42+5:302025-12-26T13:35:28+5:30
गुढीपाढव्याच्या सभेत भाजपवर टीका करणाऱ्या दिनकर पाटलांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला.

"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
MNS Dinkar Patil join BJP: राजकारणात कोणी कोणाचा कायमस्वरूपी मित्र नसतो आणि कायमस्वरूपी शत्रूही नसतो, याचा प्रत्यय पुन्हा एकदा महाराष्ट्राने घेतला. अवघ्या आठ महिन्यांपूर्वी 'राहिलं आयुष्य राज साहेबांसोबत घालवणार' अशी गर्जना करणाऱ्या दिनकर पाटील यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का दिला आहे. गुरुवारी बऱ्याच विरोधानंतरही मंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत दिनकर पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता दिनकर पाटील यांची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ज्यांच्यासाठी पेढे वाटले, त्यांनाच सोडले
महत्त्वाचे म्हणजे, बुधवारी मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीच्या घोषणेने ज्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला, त्यांनीच गुरुवारी तडकाफडकी भाजपमध्ये प्रवेश केला. मनसेमध्ये प्रदेश सरचिटणीस पदावर असलेले आणि नाशिक महापालिकेसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेणारे दिनकर पाटील स्वतःच पक्षातून बाहेर पडल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.
"भाजपसारखे लबाड लोक पाहिले नाहीत"
दिनकर पाटील यांनी पक्ष सोडताच त्यांची आठ महिन्यांपूर्वीची एक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गुढीपाढव्याच्या मेळाव्यात त्यांनी भाजपवर सडकून टीका केली होती.
"तुम्हाला जर वाटलं राजकारण करायचं आहे तर भाजपमध्ये कधीच जाऊ नका. कारण तो लबाडांचा पक्ष आहे. ११ वर्षे भाजपमध्ये काम केलं आहे एवढे लबाड लोक पाहिले नाहीत. आम्हाला सांगायचे जो विरोधक तगडा आहे त्याच्या घरी जा आणि चहा प्या, त्याला पटवा आणि बाटवा. त्यानंतर लोकांना सांगा ते आमच्याबरोबर येणार आहेत. त्यांना काही द्यायचे नाही. अरे आम्हालाच काही नाही दिले त्यांना काय देणार. अशी बोलायची संधी पहिल्यांदाच आली आहे. मंत्र्यांनी दम दिल्यानंतर मी राज ठाकरेंना भेटलो आणि त्यांनी फोन केला. मी पाच फुटांचाच आहे पण मी साहेबांमुळे सात फुटांचा झालोय. मी ठरवलं आहे राहिलेलं आयुष्य साहेबांबरोबर आणि त्यांच्या नेतृत्वात घालवायचं," असं दिनकर पाटील म्हणाले होते.
का बदलली विचारधारा?
दिनकर पाटील यांनी आपल्या पक्षांतराचे समर्थन करताना विकासासाठी भाजपमध्ये जात आहे असे कारण दिले आहे. "मी राज साहेबांवर नाराज नाही, पण विकासासाठी हा निर्णय घेतला," असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, राजकीय जाणकारांच्या मते, यामागे आगामी महापालिका निवडणुकीची समीकरणे आहेत. नाशिकच्या सातपूर भागात पाटलांचे वर्चस्व असून पत्नी आणि मुलासाठी उमेदवारी निश्चित करण्यासाठीच त्यांनी ही उडी मारल्याची चर्चा आहे.
मनसेसाठी मोठा धक्का
दिनकर पाटील यांनी अशा प्रकारे ऐन निवडणुकीच्या तोंडावर साथ सोडणे, हा मनसेसाठी नाशिकमध्ये मोठा पेच मानला जातोय. विधानसभा निवडणुकीत पराभूत होऊनही पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली होती.