नाशिकमध्ये थरार! AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या कारचा पाठलाग, भाजपा इच्छुकांचा कारनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 13:29 IST2025-12-30T13:28:14+5:302025-12-30T13:29:52+5:30
छत्रपती संभाजीनगर आणि अकोला येथे भाजपा इच्छुकांना पक्षाने तिकीट नाकारल्याने मोठं नाराजीनाट्य घडले. त्याठिकाणी इच्छुक उमेदवाराने आत्मदहनाचाही प्रयत्न केला. नाशिकमध्येही भाजपात तिकिटवाटपाचा घोळ सुरूच आहे

नाशिकमध्ये थरार! AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या कारचा पाठलाग, भाजपा इच्छुकांचा कारनामा
नाशिक - महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची पळापळ सुरू आहे. उमेदवारी न मिळाल्याने अनेक इच्छुक नाराज झालेत. दुसरीकडे नाशिक शहरात भाजपा इच्छुक उमेदवारांचा कारनामा पाहायला मिळत आहे. याठिकाणी चक्क AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या कारचा पाठलाग करत असल्याचे थरारक दृश्य समोर आले. उमेदवारी अर्ज भरायला शेवटचे काही तास शिल्लक आहेत त्यात पक्ष उमेदवारी देईल की नाही याची धास्ती इच्छुकांना आहे. त्यामुळे नाशिकमध्ये एबी फॉर्म घेऊन जाणाऱ्या कारचा पाठलाग करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर आणि अकोला येथे भाजपा इच्छुकांना पक्षाने तिकीट नाकारल्याने मोठं नाराजीनाट्य घडले. त्याठिकाणी इच्छुक उमेदवाराने आत्मदहनाचाही प्रयत्न केला. नाशिकमध्येही भाजपात तिकिटवाटपाचा घोळ सुरूच आहे. उमेदवारी मिळावी यासाठी कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या वाहनाचा पाठलाग केला आहे. AB फॉर्म घेऊन नेते उमेदवारांना फॉर्म देणार होते. मात्र इच्छुकांनी फॉर्म नेणाऱ्या भाजपा शहर अध्यक्ष सुनील केदार यांच्या कारचा पाठलाग केला आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये भाजपातील निष्ठावंत नाराज आहे. इतर पक्षातून मोठ्या संख्येने पक्षप्रवेश झाल्याने निष्ठावंतांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भाजपात पक्षप्रवेश केलेल्यांना ऐनवेळी उमेदवारी मिळत असल्याने भाजपाचे जे निष्ठावंत कार्यकर्ते होते त्यांना उमेदवारीत डावलण्यात येत आहे. त्यात भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या कारचा पाठलाग इच्छुक उमेदवारांनी केला. नाशिक मुंबई महामार्गावर हा थरार रंगला. शहराध्यक्षांच्या वाहनाच्या मागे इच्छुक उमेदवारही वाहनाने त्यांच्या कारचा पाठलाग करत होते. ही दृश्य स्थानिक माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाली. नाशिकच्या पश्चिमेकडील, सिडको विभागातील हे इच्छुक आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपा कार्यकर्त्यांचा राडा
निवडणुकीच्या उमेदवारी वाटपावरून भाजपमधील अंतर्गत खदखद आता चव्हाट्यावर आली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या प्रभाग २० मधील इच्छूक उमेदवार दिव्या उल्हास मराठे यांनी तिकीट नाकारल्याने आज भाजपाच्या प्रचार कार्यालयात नेत्यांना अक्षरशः धारेवर धरले. "१८ वर्षे पक्षाचे काम केले, १८ केसेस अंगावर घेतल्या, पण आज १५ दिवसांपूर्वी आलेल्यांना तिकीट दिले जात आहे," असा संताप व्यक्त करत दिव्या मराठे यांनी भाजपाच्या स्थानिक नेतृत्वावर हल्लाबोल केला. मराठे यांनी यावेळी मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड आणि शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्यावर अन्यायाचा थेट आरोप केला.