पोलिसांनी केला १२ किमी पाठलाग, पण तरीही दरोडेखोर निसटले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 05:57 AM2022-09-18T05:57:02+5:302022-09-18T05:57:42+5:30

सराफाला लुटणारे फरार, वाहनासह सोने-चांदीची बॅग हस्तगत

The police chased for 12 km, but still the robbers escaped | पोलिसांनी केला १२ किमी पाठलाग, पण तरीही दरोडेखोर निसटले

पोलिसांनी केला १२ किमी पाठलाग, पण तरीही दरोडेखोर निसटले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
निजामपूर : नंदुरबार येथील सराफा व्यावसायिकाला लुटून येणाऱ्या दरोडेखोरांना पकडण्यासाठी निजामपूर पोलिसांनी तब्बल १२ किलोमीटरचा पाठलाग केला. दरोडेखोरांना पकडण्यासाठी रस्त्यावर वाहनेही आडवे लावण्यात आले. रस्त्यावरील वाहनधारकांनी शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा थरार अनुभवला. मात्र, दरोडेखोर वाहन सोडून फरार झाले.  वाहनात चोरलेली बॅग व एक पिस्तूल सापडले असून, पोलिसांनी ते जप्त केले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार येथील सराफा व्यावसायिक रूपेश सुमनलाल सोनार हे शुक्रवारी आपले दुकान बंद करून घरी जात होते. त्यांच्याजवळ असलेली सोने-चांदीची बॅग चोरट्यांनी हिसकावून चारचाकी वाहनाने त्यांनी पोबारा केला. चोरटे निजामपूरकडे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. छडवेल जवळ पोलिसांनी चोरट्यांच्या वाहनाला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांनी जैताणेकडे पळ काढला. तेथून पोलिसांनी तब्बल १२ किलोमीटर अंतरापर्यंत चोरट्याच्या वाहनाचा पाठलाग केला. चोरांना पकडता यावे, यासाठी पोलिसांनी खुडाणे चौफुलीजवळ रस्त्यावरच ट्रक, रिक्षा आडव्या उभ्या केल्या. पुढे जाण्यास अडचण असल्याचे बघून चोरट्यांनी पुन्हा नंदुरबार रस्त्याकडे आपले वाहन वळविले. वाजदरे गावाच्या जवळ पूर्वच्या दिशेने आखाडे गावाकडे त्यांनी गाडी नेली. मात्र, पोलिसांचा पाठलाग सुरूच होता. चोरट्यांनी नदीकडे गाडी नेली. त्याच ठिकाणी आपले वाहन सोडून चोरट्यांनी लगतच्या जंगलात पळ काढला.
पोलिसांनी चाेरट्यांचे वाहन ताब्यात घेतले. या वाहनात एक पिस्तुलीसह सोने-चांदीचे दागिने असलेली बॅगही आढळून आली. या बॅगेत नेमके कितीचे दागिने होते, हे मात्र समजू शकले नाही.
 

Web Title: The police chased for 12 km, but still the robbers escaped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.