Nanded Municipal Election Results 2026: 'नांदेडमध्ये 'कमळ' फुललं, 'हाता'तून सत्ता निसटली!; भाजपचे ४३ जागांसह निर्विवाद वर्चस्व
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 14:48 IST2026-01-16T14:46:16+5:302026-01-16T14:48:20+5:30
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपचे कमळ फुलले; शिंदेसेनेचा सुपडा साफ

Nanded Municipal Election Results 2026: 'नांदेडमध्ये 'कमळ' फुललं, 'हाता'तून सत्ता निसटली!; भाजपचे ४३ जागांसह निर्विवाद वर्चस्व
नांदेड: राज्याचे लक्ष लागून असलेल्या नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय नोंदवत नांदेडच्या राजकारणाला कलाटणी दिली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, भाजपने ८१ पैकी ४३ जागांवर विजय मिळवून महापालिकेवर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. या निकालाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि स्थानिक नेत्यांच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला आहे.
भाजपची सुसाट घोडदौड
२० प्रभागांमधील ८१ जागांसाठी पार पडलेल्या या निवडणुकीत तब्बल ४९१ उमेदवार रिंगणात होते. सुरुवातीच्या कलांपासूनच भाजपने आपली आघाडी कायम ठेवली होती. ४३ जागा जिंकत भाजपने स्पष्ट बहुमताचा आकडा पार केला आहे. विशेष म्हणजे, एकेकाळी नांदेडवर एकहाती सत्ता गाजवणाऱ्या काँग्रेसला केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर 'किंगमेकर' ठरू पाहणाऱ्या एमआयएमलाही ४ जागांवरच यश मिळाले आहे.
शिंदेसेनेची पाटी कोरीच
राज्यात सत्तेत असलेल्या शिंदेसेनेसाठी नांदेडचा निकाल अत्यंत निराशाजनक ठरला आहे. भाजपसोबत युती न करता स्वतंत्र लढत असतानाही शिंदेसेनेला अद्याप एकही जागा जिंकता आली नाही. दुसरीकडे भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आणि ढोल-ताशांच्या गजरात नांदेड शहर दणाणून सोडले आहे.
विकासाच्या मुद्द्यावर मतदारांचा कौल
गेल्या अनेक वर्षांपासून नांदेडमध्ये काँग्रेसची सत्ता होती. मात्र, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यात भाजपच्या दिशेने वारे वाहू लागले. नगरपरिषदेच्या निकालानंतर मनपाचे सर्व सूत्र अशोकराव यांच्या हाती होती. चव्हाण यांचे नियोजन आणि केंद्रातील, राज्यातील सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या विकासकामांच्या आश्वासनांवर नांदेडकरांनी विश्वास दर्शवल्याचे या निकालावरून स्पष्ट होत आहे. आता नांदेडचा 'महापौर' भाजपचाच होणार हे निश्चित झाले असून, शहरातील आगामी राजकारणाची समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत.