जोडा शोभतो! बोहल्यावर चढण्या अगोदरच वधू- वर पोहचले मतदानाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 18:49 IST2024-04-26T18:48:46+5:302024-04-26T18:49:08+5:30
वधू-वराने बोहल्यावर चढण्या अगोदर मतदान करून इतरांपुढे आदर्श निर्माण केला आहे

जोडा शोभतो! बोहल्यावर चढण्या अगोदरच वधू- वर पोहचले मतदानाला
- शब्बीर शेख
देगलूर: एकीकडे 26 एप्रिल हा लोकसभा मतदानाचा दिवस तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात लग्नाचा मुहूर्त असल्यामुळे याचा फटका मतदानाच्या टक्केवारीवर तर होणार नाही ना अशी शंका उपस्थित केली जात होती. त्यामुळे प्रत्येक मतदाराने आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन निवडणूक विभागाकडून करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील एका वधू-वराने बोहल्यावर चढण्या अगोदर मतदान करून इतरांपुढे आदर्श निर्माण केला आहे.
शहरातील कुंभारगल्ली येथील सुंदरबाई सुरेश हनमंतकर यांची मुलगी अनिता हिचा विवाह शहरातीलच मुकुंदनगर येथील चंद्रकला विकास कांबळे यांचा मुलगा सचिन यांच्यासोबत आज दुपारी 12:32 वाजता आयोजित करण्यात आला. मात्र विवाह मुहूर्त आणि मतदानाचा दिवस एकाच दिवशी आल्याने वधू-वराने राष्ट्रहिताला प्रथम प्राधान्य दिले. आधी मतदान मगच लग्न विधी असा निश्चय करीत दोघांनी दुपारी मतदान केंद्र गाठून 12:20 वाजण्याच्या सुमारास मतदान केले. या नववधू-वराने बोहल्यावर चढण्या अगोदर मतदान केल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.