"मी मुख्यमंत्री असतो तर..."; नांदेडला मंत्रीपद न मिळाल्याने अशोक चव्हाणांनी व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 10:14 IST2024-12-16T09:57:30+5:302024-12-16T10:14:17+5:30
भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनींही नांदेडला मंत्रिपद न मिळाल्याने खंत बोलून दाखवली आहे.

"मी मुख्यमंत्री असतो तर..."; नांदेडला मंत्रीपद न मिळाल्याने अशोक चव्हाणांनी व्यक्त केली खंत
Ashok Chavan on Maharashtra Cabinet Expansion: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी नागपुरात पार पडला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी ३३ कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ३९ जणांपैकी २० नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मात्र काही जिल्ह्यातील नेत्यांची मंत्रिपदाची इच्छा पूर्ण न झाल्याने काही प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनींही नांदेडला मंत्रिपद न मिळाल्याने खंत बोलून दाखवली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळात ४२ मंत्री झाले. तर एक पद अद्याप रिक्त आहे. महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळात विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र असा विभागीय समतोल राखण्यात आला. मात्र मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याला एकही मंत्रिपद न मिळाल्याने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी खंत व्यक्त केली आहे. नांदेडला भविष्यात कधी ना कधी मंत्रीपद मिळेल अशी आशा अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.
"यावेळी परभणी, बीडला संधी मिळाली. त्यामुळे आम्हाला त्याचाही आनंद आहे. मराठवाडा म्हटल्यानंतर इतरही जिल्ह्यांना संधी मिळणे आवश्यक होती. नांदेडलाही भविष्यात कधी ना कधी मिळेलच," असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं
यावेळी अडीच वर्षांनी नांदेडला मंत्रीपद मिळेल का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना अशोक चव्हाण यांनी, "मी मुख्यमंत्री असतो तर, विचार केला असता. पण मी मुख्यमंत्री नसल्याने सांगता येत नाही," असं म्हटलं.
सातारा जिल्ह्याला सर्वाधिक मंत्रीपदं
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याला मंत्रिमंडळात सर्वाधिक मंत्रीपदं मिळाली आहेत. साताऱ्यात चार कॅबिनेट मंत्री आहेत. शंभूराज देसाई (पाटण), शिवेंद्रराजे भोसले (सातारा), जयकुमार गोरे (माण) व मकरंद पाटील (वाई) यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आहे. तर पुणे जिल्ह्याला तीन कॅबिनेट व एक राज्यमंत्रीपद मिळालं आहे.