कार्यकर्त्यांकडून स्वबळाची मागणी, पण भाजपचा महायुतीवरच राहणार भर
By योगेश पांडे | Updated: November 10, 2025 16:59 IST2025-11-10T16:57:08+5:302025-11-10T16:59:14+5:30
चंद्रशेखर बावनकुळे : महायुतीची चाचपणी अंतिम टप्प्यात

Workers demand self-reliance, but BJP will remain focused on the grand alliance
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात काही ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून स्वबळाची मागणी करण्यातयेत आहे. मात्र असे असले तरी भाजपचा भर मात्र महायुतीवर राहणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. सोमवारी नागपुरात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
सोमवारी रामटेकमधील पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वबळावर लढण्याचा आग्रह केला. यानंतर बावनकुळे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्रात महायुतीची चाचपणी अंतिम टप्प्यात असून महायुतीचाच मार्ग योग्य आहे .मात्र महायुती शक्य नसलेल्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत घेताना मतभेद आणि मनभेद होणार नाहीत याची खबरदारी घेण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. रामटेकमधील पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र लढतीची मागणी केली हे सत्य असले तरी त्यांना आवश्यक सूचना करण्यात आल्या आहेत. तिकीट वाटप आणि स्थानिक निर्णयांसाठी सर्वाधिकार जिल्हाध्यक्ष आणि कोर कमिटीला देण्यात आले आहेत. महायुतीची चाचपणी सुरू असून १७ नोव्हेंबरपर्यंत त्याचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. वाटाघाटी शेवटच्या दिवसापर्यंत सुरू राहणार आहेत, असे बा्वनकुळे यांनी सांगितले.
भाजपमध्ये बंडखोरीच शक्यता कमी
भाजपमध्ये बंडखोरीची शक्यता कमी आहे. भाजपमध्ये शिस्त आहे आणि कार्यकर्त्यांना तिकीटासाठी योग्यवेळी मागणी करणे माहिती आहे. डबल इंजिन सरकारच्या योजना स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
ओबीसी आरक्षणावर ठाम भूमिका
उद्धव ठाकरे सरकारच्या काळात २७ टक्के ओबीसी आरक्षण रद्द झाले होते. महायुती सरकारने सर्वोच्च न्यायालयात उच्चस्तरीय वकील नेमून ते आरक्षण पुन्हा मिळवले. राज्यातील सर्व १८ पगड जाती, साडेतीनशे मायक्रो ओबीसी गट यांना या निवडणुकीत प्रतिनिधित्वाची संधी मिळणार आहे. खरे-खोटे ओबीसी अशी भाषा चुकीची असल्याचे बावनकुळे म्हणाले.
निवडणूक आयोगाबाबतच्या वक्तव्यावरून कडूंवर टीका
माजी मंत्री बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की संविधानिक संस्थांबाबत अशी टीका योग्य नाही. जिंकले तेव्हा आयोग चांगला, हरले तेव्हा आरोप करणे ही चुकीची प्रवृत्ती असल्याचे त्यांनी नमूद केले. बच्चू कडू यांच्या गाडी फोड प्रकरणावरदेखील त्यांनी भाष्य केले. राज्यात कायद्याचे पालन करण्यावर सरकारचा भर आहे. कोणी कोणाची गाडी फोडू शकत नाही आणि असे प्रकार होणे अयोग्य आहे, असे ते म्हणाले.