खुद्द गडकरींच्या घरातच मतदार यादीचा घोळ ! एकाच कुटुंबातील सदस्यांची दोन वेगवेगळ्या केंद्रांवर धाव
By मोरेश्वर मानापुरे | Updated: January 15, 2026 20:19 IST2026-01-15T20:18:19+5:302026-01-15T20:19:10+5:30
Nagpur : निवडणूक आयोगाच्या तांत्रिक नियोजनाचा फटका सर्वसामान्यांप्रमाणेच आता बड्या नेत्यांनाही बसू लागला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कुटुंबाला आज मतदार यादीतील गोंधळाचा थेट अनुभव आला.

Voter list confusion in Gadkari's own house! Members of the same family run for two different centers
नागपूर : निवडणूक आयोगाच्या तांत्रिक नियोजनाचा फटका सर्वसामान्यांप्रमाणेच आता बड्या नेत्यांनाही बसू लागला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कुटुंबाला आज मतदार यादीतील गोंधळाचा थेट अनुभव आला. कुटुंबातील ६ सदस्यांची नावे एकाच ठिकाणी असण्याऐवजी ती दोन वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर विभागली गेल्याने गडकरींनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
एकाच कुटुंबाचे दोन तुकडे : कुठे झाले मतदान?
मतदार यादीतील या घोळामुळे गडकरी कुटुंबाला मतदानासाठी दोन वेगवेगळ्या केंद्रांवर जावे लागले. महाल भागातील न्यू इंग्लिश हायस्कूल येथे नितीन गडकरी, त्यांच्या पत्नी कांचन गडकरी, मोठा मुलगा निखिल गडकरी, सून ऋतुजा गडकरी आणि धाकटा मुलगा सारंग गडकरी यांच्या पत्नी मधुरा गडकरी यांनी मतदान केले. गडकरींचा धाकटा मुलगा सारंग गडकरी यांचे नाव या केंद्रावर नसल्यामुळे त्यांना कुटुंबापासून वेगळे येऊन कोठी रोड येथील डॉ. हेडगेवार ई-लायब्ररी येथे मतदान करावे लागले.
हा घोळ थांबवा; गडकरींचा निवडणूक आयोगाला इशारा
आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर गडकरींनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या गोंधळावर बोट ठेवले. ते म्हणाले, मतदार याद्यांमधील नावांचा घोळ ही आता नेहमीचीच बाब झाली आहे. यावेळी तर माझ्या स्वत:च्या घरात हा प्रकार घडला. कुटुंबातील ५ सदस्य एका बूथवर आणि १ सदस्य दुसऱ्या बूथवर मतदानासाठी गेले. निवडणूक आयोगाने ही यंत्रणा तातडीने दुरुस्त करण्याची गरज आहे. या अशा गोंधळामुळे अनेक नागरिक मतदानापासून वंचित राहू शकतात. मतदानाची टक्केवारी वाढवायची असेल, तर प्रशासनाने मतदार याद्यांचे शुद्धीकरण करणे अनिवार्य असल्याचे गडकरींनी स्पष्ट केले. व्हीआयपी कुटुंबांनाही हा त्रास सहन करावा लागत असेल, तर सामान्य मतदारांचे काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.