हिवाळ्याच्या सुरुवातीलाच विदर्भ गारठला ! 'हा' जिल्हा सर्वात जास्त थंडीचा; पुढचे चार दिवस किती घसरेल पारा
By निशांत वानखेडे | Updated: November 10, 2025 20:32 IST2025-11-10T20:31:24+5:302025-11-10T20:32:42+5:30
Nagpur : साेमवारी पहाटेपर्यंत नाेंदविलेल्या १०.४ अंशासह गाेंदिया विदर्भात सर्वाधिक थंड शहर ठरले, जे सरासरीपेक्षा ६.७ अंशाने खाली गेले आहे. रविवारी ४.४ अंशाच्या घसरणीनंतर साेमवारी किमान तापमानात पुन्हा १.१ अंशाची घसरण गाेंदियात झाली.

Vidarbha gets cold at the beginning of winter! 'This' district is the coldest; How much will the mercury drop in the next four days
नागपूर : उत्तरेकडून वाहणाऱ्या अतिथंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रात चांगलाच गारठा वाढला आहे. हिवाळा जेमतेम सुरू हाेत असताना विदर्भातही थंडीची लाट सदृश्य स्थिती अनुभवायला मिळत आहे. दाेनच दिवसात विदर्भातील सर्व जिल्ह्यात रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा ४ ते ६ अंशाने खाली घसरले असल्याने रात्री हुडहुडी भरविणारी थंडी वाढली आहे.
साेमवारी पहाटेपर्यंत नाेंदविलेल्या १०.४ अंशासह गाेंदिया विदर्भात सर्वाधिक थंड शहर ठरले, जे सरासरीपेक्षा ६.७ अंशाने खाली गेले आहे. रविवारी ४.४ अंशाच्या घसरणीनंतर साेमवारी किमान तापमानात पुन्हा १.१ अंशाची घसरण गाेंदियात झाली. नागपूरचेही किमान तापमान २४ तासात २.२ अंशाने घसरले व साेमवारी पहाटे १२.२ अंशाची नाेंद झाली. हा पारा आता सरासरीपेक्षा ४.७ अंशाने खाली घसरला आहे. याशिवाय भंडारा व यवतमाळचे किमान तापमान १२ अंश, अमरावती १२.५, बुलढाणा १२.६, वाशिम १२.८, तर वर्ध्यात १३ अंश किमान तापमानाची नाेंद झाली. चंद्रपूर व गडचिराेली १४ अंशावर आहेत.
रात्रीसह दिवसाचे कमाल तापमानही ३० अंशाच्या खाली आले आहे. नागपूरला सरासरीपेक्षा २.२ व गाेंदियात ३.४ अंश कमी आहे. त्यामुळे दिवसासुद्धा गारव्याची जाणीव हाेत आहे. माेठ्या फरकाने पारा घसरत असल्याने थंड लाट सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्याची तीव्रता काही दिवस कायम राहणार आहे. त्यामुळे पुढचे तीन चार दिवस संपूर्ण विदर्भात किमान तापमान घसरून रात्री चांगल्याच थंडीची शक्यता वर्तविण्यात येत आहे.