भाजपच्या नाराज माजी नगरसेवकांची छुपी मोहीम, २५ जागा येणार धोक्यात ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 20:20 IST2026-01-05T20:19:46+5:302026-01-05T20:20:42+5:30
कार्यकर्त्यांना उमेदवारांसाठी काम करू नका, अशा दिल्या सूचना : विरोधकांना मदतीची सूट

Secret campaign by disgruntled former BJP corporators, 25 seats at risk?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका निवडणुकीत भाजपने ५१ माजी नगरसेवकांचे तिकीट कापत उमेदवारी नाकारली. यामुळे नाराज झालेल्या बऱ्याच माजी नगरसेवकांनी आता भाजप उमेदवारांविरोधात छुपी मोहीम सुरू केली आहे. पक्षाच्या उमेदवारांचे जोरात काम करू नका, सभा, बैठकांना गर्दी जमवू नका, प्रचारात खूप सक्रिय राहू नका, शक्य असेल तर पडद्यामागून विरोधी उमेदवाराला थेट मदत करा, अशा सूचना या नाराज माजी नगरसेवकांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. यामुळे बऱ्याच प्रभागात भाजपचा प्रचारच बसला असून, याचा फटका सुमारे २५ जागांवर बसण्याचा धोका निर्माण झाला आहे.
भाजपने महापालिकेत 'मिशन १२०'चा नारा दिला आहे. शहरातील १५१ पैकी १०५ जागांवर महायुतीकडून नवीन उमेदवार देण्यात आले. युतीकडून बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांना थेट एबी फॉर्मचे वाटप केले आणि ५१ माजी नगरसेवकांच्या नावावर फुली मारण्यात आली. माजी नगरसेवकांची निष्क्रियता आणि जनतेमध्ये त्यांच्याबाबत असलेला रोष यामुळे हे पाऊल उचलण्यात आले. पक्षासाठी इतके वर्षे राबूनही तिकीट नाकारल्यामुळे या ५१ पैकी अनेक जण नाराज झाले पक्षनेत्यांसमोर काहींनी उघड नाराजीही व्यक्त केली. बहुतांश जणांनी बंडखोरी करण्याचे टाळले मात्र, जवळपास काही माजी नगरसेवकांनी विद्यमान उमेदवारांविरोधातच छुपी मोहीमा सुरू केली आहे. त्यांचे समर्थक तसेच प्रभागातील नागरिकांमध्ये संबंधित माजी नगरसेवकावर अन्याय झाला असून, नवीन उमेदवाराविरोधात वातावरणनिर्मिती करण्यात येत आहे.
बाहेरील उमेदवार का थोपविला?
मुख्यमंत्र्यांचाच मतदारसंघ असलेल्या दक्षिण-पश्चिम नागपुरातील एका माजी नगरसेवकाने तर 'लोकमत'सोबत बोलताना थेट ही बाब बोलून दाखविली. मी माझ्या प्रभागाचा आजवर झाला नाही, इतका विकास केला. मात्र, बाहेरील प्रभागातील व्यक्तीची उमेदवारी आमच्यावर थोपविण्यात आली. ही बाब नागरिकांनाही खटकत आहे आणि निश्चितपणे याचा पक्षाला फटका बसेल, अशी संतप्त प्रतिक्रिया संबंधित माजी नगरसेवकाने बोलून दाखविली. अनेक माजी नगरसेवकांचा असाच सूर असून, पक्षनेत्यांनी शब्द देऊनही उमेदवारी दिलेली नाही. अशा स्थितीत आमची काय क्षमता आहे हे दाखवून देण्याची गरज आहे असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रभागाबाहेरील उमेदवारांसमोरील आव्हाने निश्चित वाढणार आहेत.
या माजी नगरसेवकांना बसला होता धक्का
भाजपने मागील काही कालावधीतील सर्वेक्षण अहवाल, सक्रियता आणि मुलाखती यांच्या आधारावर तिकिटांचे वाटप केले. त्यात अनेक माजी नगरसेवकांचे तिकीट कापण्यात आले आणि त्यांना इतर कुठूनही संधी देण्यात आली नाही. त्यात नंदा जिचकार, सरला नायक, शकुंतला पारवे, नसीमबानो खान, प्रवीण भिसीकर, अर्चना पाठक, अमर बागडे, वर्षा ठाकरे, उज्ज्वला शर्मा, संजय बंगाले, शिल्पा थोटे, योगीता तेलंग, प्रमोद कौरती, लता काडगाए, सुमेधा देशपांडे, नेहा वाघमारे, यशश्री नंदनवार, दीपराज पार्डीकर, महेश महाजन, ज्योती भिसीकर, राजेश घोडपागे, वंदना यंगटवार, श्रद्धा पाठक, मनोज चापले, मनीषा धावडे, अनिल गेंद्रे, चेतना टांक, वैशाली रोहनकर, मनीषा कोठे, समिता चकोले, वंदना भुरे, हरीष दिकोंडवार, रेखा साकोरे, भगवान मेंढे, स्वाती आखतकर, नागेश सहारे, रिता मुळे, उषा पॅलेट, शीतल कामडे, अभय गोटेकर, वंदना भगत, राजेंद्र सोनकुसरे, माधुरी ठाकरे, जयश्री वाडीभस्मे, अविनाश ठाकरे, पल्लवी शामकुळे, लहुकुमार बेहते, प्रकाश भोयर, प्रमोद तभाने, सोनाली कडू यांचा समावेश आहे.