नितीन गडकरींच्या संपत्तीत ५१ टक्क्यांची वाढ; पाच वर्षांत एवढे कोटी वाढले

By योगेश पांडे | Published: March 27, 2024 11:42 PM2024-03-27T23:42:27+5:302024-03-27T23:43:06+5:30

कर्जाचा आकडादेखील वाढला : पाच वर्षांत एकाही नवीन भूखंडाची खरेदी नाही

Nitin Gadkari's wealth increased by 51 percent; in last five years | नितीन गडकरींच्या संपत्तीत ५१ टक्क्यांची वाढ; पाच वर्षांत एवढे कोटी वाढले

नितीन गडकरींच्या संपत्तीत ५१ टक्क्यांची वाढ; पाच वर्षांत एवढे कोटी वाढले

नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदीमंत्री नितीन गडकरी यांनी निवडणूक शपथपत्रात संपत्तीचे विस्तृत विवरण दिले आहे. त्यानुसार गडकरी, त्यांच्या पत्नी कांचन यांच्या नावे मिळून एकूण १५.५२ कोटींची संपत्ती आहे. मागील पाच वर्षांत गडकरी दांपत्याच्या संपत्तीत ५१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर एकूण कर्जाची रक्कमदेखील वाढली आहे.

२०१९ साली गडकरी व त्यांच्या पत्नीकडे मिळून १० कोटी २७ लाख ३४ हजार ८५४ रुपयांची संपत्ती होती. तर २०२४ मध्ये हा आकडा १५ कोटी ५२ लाख ६० हजार ४६ इतका झाला. शपथपत्रातील माहितीनुसार गडकरी व त्यांच्या पत्नीकडे २०१९ साली १ कोटी ६१ लाख ३७ हजार ८५१ रुपयांची चल संपत्ती होती. २०२४ मध्ये हा आकडा २ कोटी ५७ लाख ७७ हजार ४६ इतका झाला आहे. यात २७ हजार ५० रुपयांची रोकड, ६५ लाख १० हजार ३०० रुपयांचे ‘बँक डिपॉझिट्स’, ३८ लाख ५० हजार ३९६ हजार रुपयांची गुंतवणूक, ४५ लाख ९४ हजार ८४३ रुपयांची वाहने तर ५६ लाख १ हजार ७५७ रुपयांच्या दागिन्यांचा समावेश आहे.

अचल संपत्ती जैसे थे, मूल्य वाढले
२०१९ ते २०२४ या कालावधीत गडकरी व त्यांच्या पत्नीच्या नावे कुठलीही नवीन अचल संपत्तीची खरेदी झालेली नाही. २०१९ साली त्यांच्याकडे ८ कोटी ६५ लाख ९७ हजार रुपये मूल्याची अचल संपत्ती होती. आता त्याचे मूल्यांकन १२ कोटी ९४ लाख ८३ हजार इतके आहे. अचल संपत्तीमध्ये १ कोटी ५७ लाख ४१ हजारांची धापेवाडा येथे १५ एकर शेतजमीन, वरळी येथील ४ कोटी ९५ लाख चालू बाजारमूल्य असलेला फ्लॅट, धापेवाडा येथील १ कोटी २८ लाख ३२ हजारांचे वडिलोपार्जित घर, उपाध्ये मार्ग येथील ५ कोटी १४ लाखांचे घर यांचा समावेश आहे. केवळ नितीन गडकरी यांच्या नावे १ कोटी ३२ लाख ९० हजारांची चल संपत्ती व ४ कोटी ९५ लाखांची अचल संपत्ती आहे.

वाहनांचे मूल्य घटले
२०१९ साली गडकरी व त्यांच्या पत्नीकडे एकूण सहा कार होत्या व त्यांचे तत्कालिन मूल्य ४६ लाख ७६ हजार इतके होते. आता गडकरी दांपत्याकडे सहा वाहने असून त्यांचे मूल्य ४५ लाख ९४ हजार इतके आहे. २०१९ ते २०२४ या कालावधीत त्यांनी दोन कार खरेदी केल्या.

वार्षिक उत्पन्नात वाढ, कर्जाचा आकडादेखील वाढला
२०१९ साली गडकरी दांपत्यावर १ कोटी ६२ लाख २९ हजार रुपयांचे कर्ज होते. पाच वर्षांत कर्जाचा आकडा वाढून २ कोटी ४ लाख ९१ हजार १४० वर पोहोचला आहे. २०१७-१८ साली गडकरी दांपत्याचे वार्षिक उत्पन्न ४५ लाख ८३ हजार रुपये होते. २०२२-२३ मध्ये त्यात १८.८४ टक्क्यांची वाढ होऊन तो आकडा ५४ लाख ४६ हजार ९० इतका झाला आहे.

दहा न्यायालयीन प्रकरणे
दरम्यान, गडकरी यांच्याविरोधात विविध प्रकारचे दहा न्यायालयीन खटले सुरू आहेत.

पाच वर्षांत सात मानद पदव्या
दरम्यान, गडकरी यांना २०१९ ते २०२४ या पाच वर्षांच्या कालावधीत सात मानद पदव्या प्रदान करण्यात आल्या. यात चार डी.लिट, एक पीएचडी व दोन डीएस्सी पदव्यांचा समावेश आहे. त्यांच्या कार्यासाठी या पदव्या त्यांना देण्यात आल्या. गडकरी यांचे शिक्षण बीकॉम व एलएलबी झाले आहे.

वर्षनिहाय संपत्ती
संपत्ती : २०१९ : २०२४
चल संपत्ती : १,६१,३७,८५१ : २,५७,७७,०४६
अचल संपत्ती : ८,६५,९७,००० : १२,९४,८३,०००
कर्ज : १,६२,२९,०५५ : २,०४,९१, १४०

Web Title: Nitin Gadkari's wealth increased by 51 percent; in last five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.