"सगळ्या गोष्टींवर फार बारकाईने लक्ष आहे"; विधिमंडळात पाऊल टाकताच नितेश राणेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 11:00 IST2024-12-16T11:00:32+5:302024-12-16T11:00:52+5:30
अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे

"सगळ्या गोष्टींवर फार बारकाईने लक्ष आहे"; विधिमंडळात पाऊल टाकताच नितेश राणेंचा इशारा
Nitesh Rane : हिवाळी अधिवेशनाच्या आधीच नागपुरात महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडले आहे. तिन्ही पक्षांनी जुन्या नेत्यांना बाजूला ठेवत अनेक नव्या चेहऱ्यांना आणि तरुणांना संधी दिली आहे. कणकवलीचे भाजप आमदार नितेश राणे यांनाही मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. नितेश राणे यांना मंत्रीपद मिळताच तळकोकणात जल्लोष करण्यात आला. त्यानंतर आता अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. सगळ्या गोष्टींवर आमचं फार बारकाईने लक्ष असल्याचे नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
नितेश राणे हे सिंधुदुर्गातील कणकवली मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. नितेश राणे यांचे भाऊ निलेश राणेही यंदा महाराष्ट्राच्या विधिमंडळात आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे आता राणे बंधुंची जोडी सरकारमध्ये दिसणार आहे. सोमवारी मंत्री म्हणून नितेश राणे यांनी पहिल्यादाच विधिमंडळात पाऊल टाकलं. यावेळी माध्यमांशी बोलताना . माझ्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी १०० टक्के कशी पार पाडणार असल्याचे नितेश राणे म्हणाले.
"मंत्री म्हणून पहिल्यांदा विधिमंडळात पाऊल टाकलं आहे. माझ्या पक्षाच्या नेतृत्वाने आणि वरिष्ठ नेत्यांनी आमच्यासारख्या हिंदुत्ववादी तरुण कार्यकर्त्यांवर फार मोठी जबाबदारी टाकली आहे. महाराष्ट्र, कोकण आणि हिंदू समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी मी जास्तीत जास्त माझ्या पदाच्या माध्यमातून प्रयत्न करेन. माझ्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी १०० टक्के कशी पार पाडता येईल या दृष्टीने पाऊले टाकणार आहे, असं नितेश राणे म्हणाले.
"विरोधकांनी ईव्हीएम विरोधात लोकसभेच्या नंतर आंदोलन केले असते लोकांना त्यांच्यावर विश्वासही बसला असता. आता लोकांनाही माहिती आहे की हे हिंदू द्वेषाचे राजकारण आहे. व्होट जिहाद झाला तेव्हा या लोकांना काहीच वाटलं नाही. आता हिंदू समाजाने एकत्र येऊन हिंदुत्ववादी विचाराचे सरकार निवडले तेव्हा या लोकांना मिरच्या लागत आहेत. विरोधक जे काही करत आहेत ते हिंदू समाज खुल्या डोळ्याने पाहत आहे. त्यामुळे ईव्हीएमच्या या आंदोलनाला काही अर्थ नाही," असंही नितेश राणेंनी म्हटलं.
यावेळी माध्यमांनी तु्म्हाला संजय राऊत यांच्याकडून शुभेच्छा आल्या आहेत का असा सवाल नितेश राणे यांना केला. यावर बोलताना त्यांचे मन एवढं मोठं नाही असं नितेश राणे म्हणाले. "महाराष्ट्रातून शुभेच्छा येत आहेत. पण ते एवढ्या मोठ्या मनाचे नाहीत. महाराष्ट्रासाठी काम करणाऱ्या लोकांना शुभेच्छा द्याव्यात एवढ्या मोठ्या मनाचे ते नाहीत. आम्ही त्यांना ३९ वर्षे ओळखतो. अशा लोकांकडून आम्हाला शुभेच्छा नकोच आहेत. त्यांनी फक्त महाराष्ट्रामध्ये यापुढे नीट वागावं. सगळ्या गोष्टींवर आमचं फार बारकाईने लक्ष आहे. सरकार आमचं आहे. सरकारमध्ये असताना कुणी महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर प्रहार करण्यासाठी आम्ही तयार आहोत," असा इशारा नितेश राणे यांनी दिला.