Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 23:03 IST2025-12-30T23:01:28+5:302025-12-30T23:03:50+5:30
Nagpur Municipal Election 2026: नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी अखेर भाजपा व शिंदेसेनेची कोंडी अखेरच्या रात्री फुटली व आठ जागा शिंदेसेनेला गेल्या. मात्र भाजपने तेथेदेखील राजकीय चाल खेळत त्यापैकी सहा जागांवर स्वत:चेच उमेदवार उभे केले.

Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
नागपूर: महानगरपालिका निवडणुकीसाठी अखेर भाजपा व शिंदेसेनेची कोंडी अखेरच्या रात्री फुटली व आठ जागा शिंदेसेनेला गेल्या. मात्र भाजपने तेथेदेखील राजकीय चाल खेळत त्यापैकी सहा जागांवर स्वत:चेच उमेदवार उभे केले. शहरातील १५१ पैकी १०५ जागांवर युतीने १०५ म्हणजेच तब्बल ७० टक्के नवीन उमेदवार दिले आहेत. माजी नगरसेवकांची निष्क्रियता व जनतेमध्ये त्यांच्याबाबत असलेला रोष यामुळे हे पाऊल उचलण्यात आले.
भाजपकडून अठराशेहून अधिक इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते व मुलाखतीदेखील झाल्या होत्या. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत ३० डिसेंबर असतानादेखील यादी जाहीर न झाल्याने इच्छुकांमध्ये बेचैनी वाढली होती. त्यातच शिंदेसेनेसोबतची कोंडीदेखील मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत कायम होती. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी झालेल्या बैठकीनंतर ही कोंडी दूर झाली व शिंदेसेनेला आठ जागा मिळाल्या. या जागा शिंदेसेनेच्या नावावर असल्या तरी सहा ठिकाणी भाजपचेच उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
बंडखोरी टाळण्यासाठी ‘सेफ’ पाऊल
युतीकडून बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांना थेट एबी फॉर्मचे वाटप केले. मंगळवारी मध्यरात्रीनंतरदेखील हा क्रम सुरू होता. नामनिर्देशन पत्र जारी करण्याची मुदत संपल्यानंतर यादी जाहीर करण्यात आली.
'या' माजी नगरसेवकांना धक्का
भाजपने मागील काही कालावधीतील सर्वेक्षण अहवाल, सक्रियता व मुलाखती यांच्या आधारावर तिकिटांचे वाटप केले. त्यात अनेक माजी नगरसेवकांचे तिकीट कापण्यात आले व त्यांना इतर कुठूनही संधी देण्यात आली नाही. त्यात सरला नायक, शकुंतला पारवे, नसीमबानो खान, प्रवीण भिसीकर, अर्चना पाठक, अमर बागडे, वर्षा ठाकरे, उज्ज्वला शर्मा, संजय बंगाले, शिल्पा धोटे, योगीता तेलंग, प्रमोद कौरती, लता काडगाए, सुमेधा देशपांडे, नेहा वाघमारे, यशश्री नंदनवार, दीपराज पार्डीकर, महेश महाजन, ज्योती भिसीकर, राजेश घोडपागे, वंदना यंगटवार, श्रद्धा पाठक, मनोज चापले, मनीषा धावडे, अनिल गेंद्रे, चेतना टांक, वैशाली रोहणकर, मनीषा कोठे, समिता चकोले, वंदना भुरे, हरीष दिकोंडवार, रेखा साकोरे, भगवान मेंढे, स्वाती आखतकर, नागेश सहारे, रिता मुळे, उषा पॅलेट, शीतल कामडे, अभय गोटेकर, वंदना भगत, राजेंद्र सोनकुसरे, माधुरी ठाकरे, जयश्री वाडीभस्मे, अविनाश ठाकरे, पल्लवी शामकुळे, लहुकुमार बेहते, प्रकाश भोयर, प्रमोद तभाने, सोनाली कडू, नंदा जिचकार यांचा समावेश आहे.