नागपुरातील बंपर व्होटिंगने धडधड वाढली; दोन विधानसभेच्या क्षेत्रात दोन लाखांवर मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 10:03 AM2024-04-21T10:03:30+5:302024-04-21T10:04:32+5:30

पश्चिम व मध्य मतदारसंघांमध्ये मात्र लक्षणीय घट 

Nagpur Lok Sabha Constituency - Both Congress and BJP are in awe of the turnout than last time | नागपुरातील बंपर व्होटिंगने धडधड वाढली; दोन विधानसभेच्या क्षेत्रात दोन लाखांवर मतदान

नागपुरातील बंपर व्होटिंगने धडधड वाढली; दोन विधानसभेच्या क्षेत्रात दोन लाखांवर मतदान

कमलेश वानखेडे

नागपूर : नागपूर मतदारसंघात २२ लाख २३ हजार २८१ मतदारांपैकी ५४.११ टक्के म्हणजेच १२ लाख २ हजार ९६२ मतदारांनी मतदान केले. यात पोस्टल मतदानाची आकडेवारी समाविष्ट नाही. उत्तर नागपूर व पूर्व नागपूर या दोन विधानसभा मतदारसंघांत दोन लाखांवर मतदान झाले आहे. उत्तर नागपुरात काँग्रेसने ‘हात’ मारल्याची, तर  पूर्व नागपुरात भाजपचे ‘कमळ’ फुलल्याची चर्चा आहे. या दोन्ही मतदारसंघांत झालेल्या ‘बंपर व्होटिंग’ काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांची धाकधूक वाढली आहे. 

 टक्केवारीचा विचार केला तर पूर्व नागपुरात सर्वाधिक ५५.७६ टक्के मतदान झाले. त्यापाठोपाठ उत्तर नागपूर ५५.१६ टक्क्यांवर राहिले. मात्र, प्रत्यक्ष मतदारसंख्येचा विचार करता उत्तर नागपूरने बाजी मारली आहे. मतदार संख्येनुसार उत्तर नागपुरात सर्वाधिक २,२३,६२० मतदारांनी मतदान केले. त्यापाठोपाठ पूर्व नागपुरात २,१६,२१६, दक्षिण-पश्चिम नागपुरात १,९९,९१६, दक्षिण नागपुरात १,९६,६६६, पश्चिम नागपुरात १,९६,२१५ व मध्य नागपुरात १,७०,६३१ मतदारांनी मतदान केले आहे.

मध्य नागपुरातही ६ हजारांची कपात
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मध्य नागपुरात १ लाख ७६ हजार ११५ मतदान झाले होते. यावेळी १ लाख ७० हजार ६३१ मतदारांनी मतदान केले. सुमरे ६ हजार मतदान कमी झाले. दक्षिण-पश्चिम मतदारसंघात २ लाख १ हजार १७९ मतदान झाले होते. यावेळी त्यात काहीअंशी कपात होऊन १ लाख ९९ हजार ९१६ मतदान झाले. द. नागपुरात गेल्यावेळी १ लाख ९९ हजार ५९६ मतदान झाले होते. यावेळी १ लाख ९६ हजार ६६६ मतदान झाले. 

ठाकरेंच्या पश्चिममध्ये साडेनऊ हजारांची घट
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम नागपुरात गेल्यावेळी २ लाख ५ हजार ८५६ मतदान झाले होते. यावेळी १ लाख ९६ हजार २१५ मतदान झाले. गेल्यावेळच्या तुलनेत पश्चिम नागपुरात ९ हजार ६४१ मतदान कमी झाले आहे. पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे हे यावेळी काँग्रेसकडून लोकसभेच्या रिंगणात होते. मात्र, त्यानंतरही त्यांना स्वत:च्या मतदारसंघात मतदान वाढविता आलेले नाही. पश्चिम नागपूरमधून त्यांना तुटीचा फटका बसू शकतो. 

पूर्वमध्ये ८ हजार, तर उत्तरमध्ये १८ हजारांची वाढ
गेल्या लोकसभा निवडणुकीत पूर्व नागपुरात २ लाख ८ हजार ३७८ मतदान झाले होते. नितीन गडकरी यांना येथे ७५ हजार ३८० मतांची आघाडी मिळाली होती.  तर उत्तर नागपुरात २ लाख ५ हजार ८५६ मतदान झाले होते. या मतदारसंघात काँग्रेसचे नाना पटोले यांनी ८ हजार ९१० मतांची आघाडी मिळाली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीशी तुलना केली असता पूर्व नागपुरात प्रत्यक्षात सुमारे ८ हजार मतदान वाढले आहे. तर उत्तर नागपुरात सुमारे १८ हजार मतदान वाढले आहे.

Web Title: Nagpur Lok Sabha Constituency - Both Congress and BJP are in awe of the turnout than last time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.