Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 23:15 IST2026-01-02T23:09:07+5:302026-01-02T23:15:57+5:30
नागपूर: शिस्तप्रिय पक्ष अशी ओळख असलेल्या भारतीय जनता पक्षाला महानगरपालिका निवडणूकीत रिंगणात उतरलेल्या बंडखोर उमेदवारांनी धक्का दिला आहे.

Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
नागपूर: शिस्तप्रिय पक्ष अशी ओळख असलेल्या भारतीय जनता पक्षाला महानगरपालिका निवडणूकीत रिंगणात उतरलेल्या बंडखोर उमेदवारांनी धक्का दिला आहे. पक्षाच्या नेत्यांनी संवाद साधल्यावरदेखील सहा जणांनी मागे घेण्यास नकार दिला. तर ९६ जणांनी मात्र पक्षाच्या नेत्यांच्या विनंतीचा मान राखून माघार घेतली आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या बहुतांश मोठ्या बंडखोरांना मनविण्यात काँग्रेस नेत्यांना यश आले आहे.
भाजपमध्ये यंदा इच्छुकांची भाऊगर्दी झाली होती व पक्षातर्फे सर्वेक्षणं, मुलाखतींनंतर उमेदवारी देण्यात आली. भाजपने तब्बल १०५ नवीन चेहरे दिले व ५१ माजी नगरसेवकांचे तिकीट कापले. अनेक इच्छुकांचा भ्रमनिरास झाला व शंभराहून अधिक भाजपच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्यात माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर, माजी नगरसेविका स्वाती आखतकर, श्रद्धा पाठक, सुनिल अग्रवाल, मुकुंद बापट, दीपक चौधरी, सुनिल मानेकर, वर्षा ठाकरे, हरीश दिकोंडवार यांचा समावेश होता. तर धीरज चव्हाण, सुबोध आचार्य यांना तर त्यांच्या प्रभागातून आणखी दोन उमेदवारांसह पक्षाकडूनच एबी फॉर्म मिळाला होता. मात्र त्यांचा एबी फॉर्म छाननीत रद्द झाला.
भाजपने बंडखोरांना मनविण्यासाठी विशेष पथक गठीत केले होते व संबंधित नेते-पदाधिकाऱ्यांकडून बंडखोरांशी संपर्क करण्यात आला. त्यातील ९६ जणांनी नेत्यांच्या विनंतीचा मान राखत शुक्रवारी माघार घेतली. मात्र प्रभाग क्रमांक १७ मधून विनायक डेहनकर, प्रभाग १४ मधून सुनिल अग्रवाल, प्रभाग १८ मधून धीरज चव्हाण-मुकुंद बापट, प्रभाग ३२ मधून दीपक चौधरी व प्रभाग ३४ मधून सुनिल मानेकर यांनी मात्र अर्ज परत घेतले नाही. ते अपक्ष म्हणून भाजपच्या उमेदवारांना टक्कर देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा भाजपच्या नियोजनासाठी धक्का मानण्यात येत आहे.
भाजप उमेदवारांविरोधात संघ स्वयंसेवक
दरम्यान प्रभाग २२ मधून संघ स्वयंसेवक असलेल्या निनाद दीक्षित या तरुणाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाकडून अर्ज दाखल केला. भाजपच्या उमेदवारांविरोधात तो उभा असून संघ मुख्यालयाजवळील भागातील स्वयंसेवकांच्या मतांमध्ये त्यामुळे विभाजन होऊ शकते. याशिवाय प्रभाग १८ मधून मुकुंद बापट यांनीदेखील अपक्ष म्हणून आव्हान दिले आहे.
काँग्रेसकडून प्रमुख बंडखोरांची सहज माघार
कॉंग्रेसकडून प्रमुख बंडखोरांनी अगदी सहज माघार घेतली. त्यांच्याशी पक्षनेत्यांनी संपर्क साधला होता. त्यात माजी नगरसेवक पुरुषोत्तम हजारे, जुल्फिकार भुट्टो, फिरोज खान, अमर बागडे, आशा उईके, जिशान मुमताज मोहम्मद इरफान अंसारी यांचा प्रामुख्याने समावेश आहे. काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करणारे मात्र पक्षाचे अधिकृत उमेदवार झाल्याने मैदानात कायम राहिले आहेत.