महाविकास आघाडी १७० जागा जिंकणार : रोहीत पवार यांचा दावा
By कमलेश वानखेडे | Updated: November 13, 2024 18:51 IST2024-11-13T18:48:21+5:302024-11-13T18:51:02+5:30
Nagpur : लोक समोरून बोलत नाहीत तर करून दाखवतात

Mahavikas Aghadi will win 170 seats: Rohit Pawar claims
कमलेश वानखेडे, नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: लोक नाराज आहे, काही ठिकाणी दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे लोक समोरून बोलत नाही तर करून दाखवत असतात. राज्यातील वातावरण पोषक आहे. महाविकास आघाडीचा स्ट्राईक रेट चांगला आहे. जवळपास १७० जागा निवडून येतील. विदर्भात सर्वाधिक चांगला स्ट्राईक रेट असेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आ. रोहीत पवार यांनी केला.
बुधवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, आपल्या हातातून निवडणूक जात आहे, हे लक्षात आल्यामुळे अजित पवार यांना खोटं बोलावं लागत आहे. खोटे बोलून आपले उमेदवार निवडून यावे असा केविलवाना प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. शरद पवार मराठी माणसाचं प्रतीक आहे. भाजपने महाराष्ट्राचा कमी गुजरातचा जास्त विचार केला आहे. त्यामुळे काही झाले तरी महाविकास आघाडीचे सरकार आणायचे, असा निर्धार आम्ही केला आहे.
या अगोदर सत्तेत असणाऱ्या लोकांच्या बॅगा तपासल्या गेल्या नाहीत. उद्धव ठाकरे यांची बॅग तपासल्यावर त्यांनी सांगितले की तपासणी करायची असेल तर दोघांचीही करा नाहीतर दोघांची करू नका. लोकं पेटून उठल्यावर आता सत्तेतील लोकांच्या बॅगा निवडणूक आयोग पासायला लागले. ज्या लोकांनी बँग तपासली त्यांना अभिनंदन पत्र निवडणूक आयोगाने दिले, ही चांगली गोष्ट आहे. पण बॅग न चेक करणाऱ्यावर काय कारवाई केली ते पत्र समोर यायला हवे, अशी मागणीही त्यांनी केली.