कुणाच्या शिव्यांनी फरक पडत नाही, मला विष प्यायची सवय; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 23:13 IST2026-01-06T23:12:51+5:302026-01-06T23:13:59+5:30
भाजपा राज्यासाठी काम करणारा पक्ष वाटतो. त्यामुळे ते आमच्यासोबत येत आहेत. मनसेने उद्धवसेनेसोबत केलेल्या युतीमुळे नुकसान होईल असे वाटल्याने मनसे नेते संतोष धुरी भाजपात आले असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

कुणाच्या शिव्यांनी फरक पडत नाही, मला विष प्यायची सवय; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
योगेश पांडे
नागपूर - कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या टीकेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर भूमिका मांडली. कुणी कितीही शिव्या दिल्या तरी माझ्यावर परिणाम होत नाही. मला विष प्यायची सवय आहे. महाराष्ट्राची जनता जोपर्यंत माझ्यासोबत आहे तोपर्यंत मला काहीच फरक पडत नाही. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना त्यांच्या पक्षात, जिल्ह्यात व तालुक्यातदेखील कुणी गंभीरतेने घेत नाही. केवळ मला शिव्या दिल्याने ते प्रसारमाध्यमांत दिसतात व त्यामुळेच ते असे बोलतात. त्यांच्या बोलण्यावर उत्तरे देऊन मी माझे तोंड का खराब करू असा सवाल फडणवीस यांनी केला.
मंगळवारी मुख्यमंत्री नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आम्ही महाराष्ट्रात सर्वच महानगरपालिकांमध्ये विकासकामे केली असून त्यावरच आम्ही मते मागतो आहे. जर आमच्यावर कुणी वार केला तर त्याला थोपवतो. बाकी पूर्ण अजेंडा विकासाचाच आहे. मुंबईत २५ वर्षात उद्धवसेनेने काहीही काम केले नाही. जर विकासाच्या मुद्द्यांवर ते बोलले तर लोकांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही हे त्यांना माहिती आहे. वेगवेगळ्या पक्षांतील नाराज लोकांना मुख्य धारेत येण्याची इच्छा आहे. भाजपा राज्यासाठी काम करणारा पक्ष वाटतो. त्यामुळे ते आमच्यासोबत येत आहेत. मनसेने उद्धवसेनेसोबत केलेल्या युतीमुळे नुकसान होईल असे वाटल्याने मनसे नेते संतोष धुरी भाजपात आले असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
देश तोडण्याची भाषा करणाऱ्यांच्या हेतूला ठेचायला हवे
आपल्या देशात राहून देशविरोधी बोलण्यात येत आहे. जेएनयूमध्ये तर शर्जिल इमामच्या औलादीनेच जन्म घेतला आहे. त्यांच्या हेतूला ठेचणे आवश्यक आहे. देशाला तोडण्याची भाषा करणाऱ्यांसोबत उभे राहणाऱ्यांचे हेतू योग्य वेळी ठेचायला हवे असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले.