महापालिका निवडणुकीत भाजपला ५.३१ लाख, तर काँग्रेसला ४.१७ लाख नागपूरकरांचा कौल ; लोकसभेत काय झाले होते ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 14:09 IST2026-01-19T14:08:14+5:302026-01-19T14:09:37+5:30
भाजपला काँग्रेसपेक्षा ८.८५ टक्के अधिक मते : तुलनेत ६८ जागा घेण्यात यश

In the municipal elections, 5.31 lakh Nagpur residents voted for BJP and 4.17 lakh for Congress; What happened in the Lok Sabha?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय पक्षांसह उमेदवारांकडून मिळालेल्या मतांची गोळाबेरीज सुरू आहे. संघाच्या शताब्दीत शतक ठोकणाऱ्या भाजपला ५ लाख ३१ हजार मतदारांनी मतदान केले, तर मिशन-१०० चे टार्गेट ठेवत मैदानात उतरलेल्या काँग्रेसला जवळपास ४ लाख १७ हजार नागपूकरांनी कौल दिला.
महापालिकेत नागपूरकर लोकसभेप्रमाणे कौल देतील असा अंदाज पोलपंडितांकडून व्यक्त करण्यात येत होता. मात्र, दलित आणि मुस्लीमबहुल भागात एमआयएम आणि इंडियन युनियन मुस्लीम लीगने मुसंडी घेतल्याने काँग्रेसचाही अंदाज चुकला.
नागपूर महानगरपालिका निवडणुकीत २४ लाख ८३ हजार ११२ मतदारांपैकी १२ लाख ७७ हजार ३०६ मतदारांनी (५१.४४ टक्के) मतदानाचा हक्क बजावला आहे. यात एकूण मतांपैकी भाजपला ४१.६९ टक्के, तर काँग्रेसला ३२.८४ टक्के मते मिळाली आहेत. ८.८५ टक्के मताधिक्याच्या जोरावर भाजपने काँग्रेसपेक्षा तब्बल ६८ जागांची आघाडी घेत १०२ जागा जिंकल्या, तर काँग्रेसला केवळ ३४ जागांवर समाधान मानावे लागले.
भाजपने सलग चौथ्यांदा महापालिकेत सत्ता मिळविली. मात्र, त्यांना १२० जागांचे लक्ष्य गाठता आले नाही. २०१७ च्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या २९ जागा होत्या. पूर्व व दक्षिण-पश्चिम तसेच दक्षिण नागपुरात काँग्रेस भाजपपुढे तग धरू शकली नाही. निवडणुकीत केंद्र व राज्यातील सत्तेच्या बळावर नागपूरला 'मेट्रोपोलिटन सिटी' बनविण्याची ग्वाही देत भाजपने मोठा विजय मिळविला, मात्र अति आत्मविश्वास काही ठिकाणी महागात पडला. भाजपचे अनेक दिग्गज नेते व माजी नगरसेवक पराभूत झाले. प्रचंड बहुमत मिळाले असले, तरी पुढील पाच वर्षे जनतेच्या विश्वासास पात्र ठरण्याचे
मोठे आव्हान भाजपपुढे आहे. अपक्षांमुळे दिग्गजांचा स्वप्नभंग अपक्ष उमेदवारांना सरासरी ४.४ टक्के म्हणजेच २ लाख २२ हजार ४०९ पेक्षा अधिक मते मिळाली. या मतांमुळे अनेक दिग्गजांना महापालिकेत प्रवेश करता आला नाही. इतर राज्यांत नोंदणीकृत असलेल्या प्रादेशिक पक्षांना सरासरी ३.१७ टक्के, तर निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत छोट्या पक्षांना १.५ टक्के मते मिळाली, तर नोटाला २.३६ टक्के मते मिळाली.
महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट
गेल्या दीड वर्षांपासून केंद्र व राज्य सरकारकडून विशेष निधी न मिळाल्याने मनपाची आर्थिक स्थिती कमकुवत आहे. विविध प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपयांचे कर्ज घ्यावे लागत असल्याने याचा आर्थिक भार अखेरीस जनतेवरच पडत असल्याची लोकांमध्ये भावना व्यक्त होत आहे.
लोकसभेत काय झाले होते ?
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नागपुरात एकूण १२ लाख ७हजार ७३८ इतके मतदान झाले. या निवडणुकीत भाजपचे नितीन गडकरी यांना एकूण ६ लाख ५५ हजार २७ मते मिळाली होती. आता महापालिका निवडणुकीत १२ लाख ७७ हजार ३०६ मतदारांनी मतदान केले. या निवडणुकीत भाजपला ५ लाख ३१ हजार नागपूकरांनी कौल दिला. लोकसभेच्या तुलनेत महापालिका निवडणुकीत भाजपला १ लाख २४ हजार मते कमी मिळाली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे विकास ठाकरे यांना ५ लाख १५ हजार ९४१ मते मिळाली होती. मनपा निवडणुकीत ४ लाख १७ हजार मतदारांनी काँग्रेस उमेदवारांच्या बाजूने कौल दिला. मनपा निवडणुकीत काँग्रेसला लोकसभेच्या तुलनेत ९८,९४१ मते कमी मिळाली.