नागपुरात मनसे, आप, वंचितला मिळालीत 'नोटा'पेक्षाही कमी मते; भाजपला किती मते ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 16:04 IST2026-01-22T16:03:42+5:302026-01-22T16:04:20+5:30
२०१७ च्या तुलनेत मते वाढली : विजय नाही, पण अपक्षांच्या मतांतही मोठी वाढ

In Nagpur, MNS, AAP, Vanchit got fewer votes than 'NOTA'; How many votes did BJP get?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :नागपूर महापालिका निवडणुकीत अपक्षांसह ३७ पक्षांचे ९९३ उमेदवार मैदानात होते. मनसेला २९ हजार ५१२, आम आदमी पार्टीला ६५ हजार ७१०, वंचित बहुजन आघाडीला ४० हजार ६, शिंदेसेनेला ६३ हजार १०१, उद्धवसेनेला ८९ हजार ९४२, तर राष्ट्रवादी (शरद पवार) ७५ हजार ६२३ मते मिळाली आहेत. या पक्षांच्या तुलनेत जास्त मते नागपूरकरांनी नोटाला दिली आहेत. नोटाला १ लाख २० हजार १५१ मते दिली आहेत.
२०१७ च्या मनपा निवडणुकीत ९४ हजार ८६५ नोटाला मते होती. त्यामुळे गेल्या निवडणुकीपेक्षा नोटाला २५ हजार २८६ मते वाढली आहेत. २०१७ च्या मनपा निवडणुकीपेक्षा अपक्ष उमेदवारांना ६७हजार ८९१ मते अधिक मिळाली आहेत. निवडणुकीत मतविभाजनामुळेच एमआयएम ६ जागा, तर मुस्लीम लीग ४ जागा निवडून आल्या आहेत. या मतविभाजनाचा फटका काँग्रेस व बसपला बसला आहे.
नागपूर महापालिका निवडणुकीत भाजप १०२, काँग्रेसला ३४, एमआयएम ६, मुस्लीम लीग ४, उद्धवसेना २, शिंदेसेना १, राष्ट्रवादी (अजित पवार) व बसपला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. मनसे, वंचित, आपसह इतर छोट्या पक्षांना एकही जागा मिळालेली नाही. नागपूर महापालिका निवडणुकीत चार सदस्यीय प्रभाग होता. त्यामुळे एक मतदाराला चार मते द्यायची होती. त्यामुळे या निवडणुकीत ५० लाख ९३ हजार ३५६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. त्यात नोटाला १ लाख २० हजार १५१ मते मिळाली आहेत. उमेदवार पसंत नसलेल्या मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला आहे. हे एकूण मतदानाच्या जवळपास २.३६ टक्के आहे.
नागपूर महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच एमआयएमला सहा जागा मिळाल्या असून, या पक्षाच्या उमेदवारांना १ लाख १९ हजार १२३ मते मिळाली आहेत. तर, चार जागा जिंकणाऱ्या इंडियन युनियन मुस्लीम लीगला ३८ हजार १२० मते मिळाली आहेत.
अपक्ष उमेदवारांना २ लाख २२ हजार ८८६ मते
महापालिकेच्या २०१७च्या निवडणुकीत १ अपक्ष नगरसेवक निवडून आले होते. २०१७ च्या निवडणुकीत अपक्षांना १ लाख ५४ हजार २९५ मते मिळाली होती. आताच्या मनपा निवडणुकीत अपक्षांना २ लाख २२ हजार ८८६ मते मिळाली आहेत. ती २०१७मध्ये मिळालेल्या मतांपेक्षा अधिक आहेत.
प्रमुख पक्ष व नोटाला २०१७ व २०२६ मध्ये मिळालेली मते
भाजप १७,७४,०१८ २१,२३,७७८
काँग्रेस १३, ५८,११३ १६,७२, ७४८
बसप ४,०८,४४८ २,२५,१२३
अपक्ष १,५४,९९५ २,२२,८८६
नोटा ९४,८६५ १२०१५१