"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 21:42 IST2026-01-08T21:42:10+5:302026-01-08T21:42:54+5:30
उद्धव ठाकरेंच्या बॉम्बेबाबतच्या आरोपांना मी गंभीरतेने घेत नाही. २५ वर्षे काम केले नाही व दाखवायला काहीच नाही अशी टीका फडणवीसांनी केली.

"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
योगेश पांडे
नागपूर - मी पहिल्यांदा नगरसेवक झालो तेव्हा दुसऱ्याच दिवशी हे काम किती कठीण आहे हे लक्षात आले. मागच्या जन्मात पाप करणारा नगरसेवक होतो व महापाप करणारा महापौर होतो असे मी गमतीने म्हणतो. या दोन्ही पदांवर मोठी जबाबदारी असते व ती पार पाडण्यासाठी तसा संयम आवश्यक आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. अभिनेते भारत गणेशपुरे व अभिनेत्री-कवयित्री स्पृहा जोशी यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली.
नवीन नागपूर ठरेल रोजगाराचे ‘मॅग्नेट’
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागपूर महाराष्ट्रात राजधानीचा दर्जा सोडून सहभागी झाले होते. मात्र तरीदेखील येथे विकासाचा अनुशेष वाढतच गेला. आम्ही नागपूरसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या विकासावर लक्ष केंद्रीत केले. आता नागपुरचा वेगाने विकास होत आहे. नवीन नागपुरात तर अत्याधुनिक पायाभूत सुविधा असतील व तेथे पाच लाख रोजगारांची निर्मिती होईल. नागपुरच्या रोजगारासाठी नवीन नागपूर हे ‘मॅग्नेट’ ठरेल असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
टीका-टोमणे नव्हे विकासावर जनतेचा विश्वास
उद्धव ठाकरेंच्या बॉम्बेबाबतच्या आरोपांना मी गंभीरतेने घेत नाही. २५ वर्षे काम केले नाही व दाखवायला काहीच नाही. अफवांचा बाजार उठवून मते मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र त्यांच्या अफवांवर कुणीच विश्वास ठेवत नाही. पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने हे राजकारण सुरू आहे. जनता टीका व टोमणे नव्हे तर विकासावर मतदान करेल. किमान २७ महानगरपालिकांमध्ये महायुतीची सत्ता असेल असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
दरम्यान, मागील काही काळापासून राजकारणातील लोकांमध्ये वेगळी भावना दिसून येते आहे. आम्ही आमच्या भागाचे, मतदारसंघाचे राजे किंवा मालक असल्यासारखे ते वागतात. तेथील विकासकामे, इमारती आम्हाला विचारून झाले पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. लोकप्रतिनिधींमधील ही भावना संपली पाहिजे व सेवाभाव वाढायला हवा असे मुख्यमंत्री म्हणाले. राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर संयमासोबतच शिव्या खाण्याची तयारी देखील ठेवली पाहिजे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.