विरोधक एकजूट होऊ नयेत म्हणून सत्ताधाऱ्यांचे कट-कारस्थान: ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका
By आनंद डेकाटे | Updated: January 7, 2026 18:30 IST2026-01-07T18:29:17+5:302026-01-07T18:30:30+5:30
Nagpur : राज्यात होणारी बिनविरोध निवड असो वा राजकीय युती बघता संघ व भाजपने छोट्या-मोठया राजकीय पक्षांचे अस्तित्व संपविण्यास सुरूवात केली आहे.

Conspiracy of the ruling party to prevent the opposition from uniting: Adv. Prakash Ambedkar's criticism
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात होणारी बिनविरोध निवड असो वा राजकीय युती बघता संघ व भाजपने छोट्या-मोठया राजकीय पक्षांचे अस्तित्व संपविण्यास सुरूवात केली आहे. विरोधी पक्षांची युती आघाडी होऊच नये, यासाठी सत्ताधारी भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कटकारस्थान रचले असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी येथे केला.
महानगर पालिकेच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते नागपुरात आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते. ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, नागपुरात त्यांची युती, आघाडी होवू शकली नाही. ज्यांची राज्यस्तरीय युती आहे, त्यांचीही टिकली नाही. त्यामुळे भाजप, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे देखील अनेक ठिकाणी स्वतंत्र लढत आहे. आमच्याशी युती नाही तर कुणाशीही नाही, अशी भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतली. त्यासाठी दबावतंत्र, ब्लॅकमेलिंग केले. पुराव्याशिवाय आरोप करणे योग्य नसले तरी वाटाघाटी दरम्यान जे अनुभव आले, यातून हे दिसते. राजकीय पक्षांच्या अस्तित्वांना आव्हान देण्याचे काम भाजप आणि आरएसएसने सुरू केले आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे. राजकीय पक्ष टिकले पाहिजे. नेतेच राहणार नाही, तर प्रश्नांवर आवाज कोण उचलणार, त्यामुळे पक्ष टिकले पाहिजे. त्यासाठी कुणालाही मतदान करा पण भाजपला मतदान करू नका, असे आवाहनही ॲड. आंबेडकर यांनी यावेळी केले.
दोन ते अडीज महिन्यात देशात युद्ध
स्वयंघोषीत विश्वगुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेकेखोरपणामुळे देश युध्दासमोर येऊन ठेपला आहे. परराष्ट्र धोरण पूर्णत: कोलमडले आहे. शेजारच्या पाकिस्तान व बांग्लादेशला हाताशी धरून इतर देश भारताला कोंडीत पकडत आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच चीनसंदर्भात पंतप्रधान कार्यालय व लष्कराची वेगवेगळी भूमिका असून येत्या दोन ते अडीज महिन्यात देशाला युध्दाला सामोरे जावे लागेल, असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला.
रशीयाचे तेल भारत विकत आहे. यातून जगभरातील देशांचे भारतासोबत भांडण होत आहे. दरवर्षाला ४४ हजार कोटीचा हा नफा आहे. तो रिलायंस कंपनीच्या तिजोरीत जात असल्याचा आरोप करीत याच व्यवहारातून युक्रेनचे युध्द सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तोट्यातील मेट्रो रेल्वेचा भार महापालिकेवर येणार
पुढील ५ वर्षात मेट्रो रेल्वे मनपाकडे हस्तांतरीत करण्याचे केंद्राचे धोरण आहे. मेट्रो रेल्वे सध्या पावणे दोन हजार कोटीच्या तोटयात आहे. आधीच आथिंक कणा मोडलेल्या मनपाकडे ती हस्तांतरीत झाल्यास साडे पाच हजार कोटीचे बजेट असलेल्या नागपूर मनपाला पावणे दोन हजार कोटीचा तोटा सहन करावा लागेल. हा भार उचलायचा नसेल तर भाजपला मतदान करू नका,असे आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केला.