मुख्यमंत्र्यांकडून नागपुरात मतदान, 'मी तर म्हणतो की ऑइल पेंटचा वापर केला पाहिजे' राज ठाकरेंच्या आरोपांवर केले भाष्य
By योगेश पांडे | Updated: January 15, 2026 12:48 IST2026-01-15T12:46:40+5:302026-01-15T12:48:30+5:30
Nagpur : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान केले यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर कुठल्याही प्रकारचा संशय घेणे अयोग्य असल्याचे प्रतिपादन केले.

Chief Minister comments on Raj Thackeray's allegations on voting in Nagpur, 'I say oil paint should be used'
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान केले यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर कुठल्याही प्रकारचा संशय घेणे अयोग्य असल्याचे प्रतिपादन केले.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मार्कर पेन संदर्भातील आरोप केले होते. त्यावर फडणवीस यांनी भाष्य केले. सर्व गोष्टी निवडणूक आयोगाकडून ठरविण्यात येतात. यापूर्वीही अनेक वेळेला मार्कर पेन वापरला आहे.. याबद्दल हरकत असेल तर आयोगाने याकडे लक्ष द्यावे.
विरोधी पक्षांनी नवीन स्क्रिप्ट लिहिली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना झापले तरी पुन्हा पुन्हा तीच स्क्रिप्ट वापरतात. या निवडणुकीमध्ये आमचा विजय निश्चित आहे.. आमचे विरोधी पक्ष उद्या काय कारण सांगायची आहेत त्याची प्रॅक्टिस करत आहे. काही नेत्यांनी पॅड युनिटचे नाव पाडू युनिट ठेवले आहे. ही मशीन काही अचानक आलेली नाही. राज्य निवडणूक आयोगाने सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना बोलावून सांगितले होते. ही मशीन काय आहे याचा उपयोग कसा हे सांगितले होते.फक्त मतमोजणीला मशीन बंद पडली तरच याचा डेटा वापरला जाणार आहे. जर विरोधकांना काही न शंका असेल तर निवडणूक आयोगाने दुसऱ्या पेनचा वापर केला पाहिजे. मी तर म्हणतो की ऑइल पेंटचा वापर केला पाहिजे. मात्र निवडणुकीशी संबंधित संस्थांवर अशा पद्धतीने संशय निर्माण करणे योग्य नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्था लोकशाहीचा पाया आहे.यात जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे. मतदान फक्त अधिकार नाही कर्तव्य ही आहे. मतदान न करणं लोकशाहीत आपल्या कर्तव्याचा पालन न करणे आहे. चांगली शहर निर्माण करायची असेल तर सर्व २९ महापालिका मधील मतदारांनी जोरात मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले.
ठोकशाहीने आम्ही घाबरणार नाही
अतिशय वाईट प्रकारे आमचे पश्चिम नागपुरातील उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर हल्ला करण्यात आला, त्यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. लोकशाहीत निवडून येता येत नाही म्हणून ठोकशाही करायची त्याचा हा प्रकार आहे. मात्र कितीही हल्ले केले तरी आमचे कार्यकर्ते घाबरणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.