मुंबईला जन्माला येऊन म्हातारेदेखील झाले, विकास काय केला ते सांगा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 16:13 IST2026-01-09T16:12:20+5:302026-01-09T16:13:31+5:30
मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना सवाल : लोकप्रतिनिधींनी आम्ही मतदारसंघाचे 'राजे' ही भावना सोडावी

Born in Mumbai and grown old, tell me what development you have done?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईबाहेरील व्यक्ती असल्याचे म्हणत केलेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातून प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईला जन्माला येऊन आता लोक म्हातारे होऊ लागले आहेत. मात्र, ते विकास करू शकले नाहीत. मुंबईच्या विकासाची खरी सुरुवात तर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी ५५ उड्डाणपूल बांधून केली होती आणि मी एकनाथ शिंदेंसोबत मिळून ३६० डिग्रीने विकास केला, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले. नागपुरात आयोजित 'तरी पोहा विथ देवाभाऊ' या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
अभिनेते भारत गणेशपुरे व अभिनेत्री-कवयित्री स्पृहा जोशी यांनी ही मुलाखत घेतली. मागील काही काळापासून राजकारणातील लोकांमध्ये वेगळी भावना दिसून येते आहे. आम्ही आमच्या भागाचे, मतदारसंघाचे राजे किंवा मालक असल्यासारखे ते वागतात. तेथील विकासकामे, इमारती आम्हाला विचारून झाले पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. लोकप्रतिनिधींमधील ही भावना संपली पाहिजे व सेवाभाव वाढायला हवा, असे मुख्यमंत्री म्हणाले. राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर संयमासोबतच शिव्या खाण्याची तयारीदेखील ठेवली पाहिजे असेदेखील ते म्हणाले.
टीका-टोमणे नव्हे विकासावर जनतेचा विश्वास
उद्धव ठाकरेंच्या बॉम्बेबाबतच्या आरोपांना मी गंभीरतेने घेत नाही. २५ वर्षे काम केले नाही व दाखवायला काहीच नाही. अफवांचा बाजार उठवून मते मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, त्यांच्या अफवांवर कुणीच विश्वास ठेवत नाही. पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने हे राजकारण सुरू आहे. जनता टीका व टोमणे नव्हे तर विकासावर मतदान करेल. किमान २७ महानगरपालिकांमध्ये महायुतीची सत्ता असेल असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
नवीन नागपूर ठरेल रोजगाराचे 'मॅग्नेट'
नागपूर महाराष्ट्रात राजधानीचा दर्जा सोडून सहभागी झाले होते. मात्र, तरीदेखील येथे विकासाचा अनुशेष वाढतच गेला. आम्ही नागपूरसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या विकासावर लक्ष केंद्रित केले. आता नागपूरचा वेगाने विकास होत आहे. नवीन नागपुरात तर अत्याधुनिक पायाभूत सुविधा असतील व तेथे पाच लाख रोजगारांची निर्मिती होईल. नागपूरच्या रोजगारासाठी नवीन नागपूर हे 'मॅग्नेट' ठरेल असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
मागच्या जन्मी पाप करणारा होतो नगरसेवक-महापौर
यावेळी फडणवीस यांनी त्यांच्या शैलीत कोट्यादेखील केल्या. मी पहिल्यांदा नगरसेवक झालो तेव्हा दुसऱ्याच दिवशी हे काम किती कठीण आहे हे लक्षात आले. मागच्या जन्मात पाप करणारा नगरसेवक होतो व महापाप करणारा महापौर होतो असे मी गमतीने म्हणतो. या दोन्ही पदांवर मोठी जबाबदारी असते व ती पार पाडण्यासाठी तसा संयम आवश्यक आहे, असे फडणवीस म्हणाले.