नितीन गडकरींना लोकसभेत कमी मताधिक्य मिळणे भोवले, पश्चिम नागपुरातील बुथप्रमुख बडतर्फ!

By योगेश पांडे | Published: July 10, 2024 11:32 PM2024-07-10T23:32:22+5:302024-07-10T23:33:01+5:30

निष्क्रिय पदाधिकाऱ्यांविरोधात भाजप ‘ॲक्शन मोड’मध्ये

As Nitin Gadkari faced low majority in the Lok Sabha West Nagpur booth chief dismissed | नितीन गडकरींना लोकसभेत कमी मताधिक्य मिळणे भोवले, पश्चिम नागपुरातील बुथप्रमुख बडतर्फ!

नितीन गडकरींना लोकसभेत कमी मताधिक्य मिळणे भोवले, पश्चिम नागपुरातील बुथप्रमुख बडतर्फ!

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आघाडी १ लाख ३७ हजारांवर घसरल्याने शहर भाजपमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी संघटन मजबूत करण्यासाठी पक्षाने आता कंबर कसली आहे. या मालिकेत पक्षाने पश्चिम नागपूर विभागातील सर्व बूथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख आणि त्यांची कार्यकारिणी बडतर्फ केली आहे. यासोबतच २५ जुलैपर्यंत नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सूचनाही मंडळ अध्यक्षांना देण्यात आल्या आहेत.

लोकसभा निवडणूकीत गडकरी यांचे मताधिक्य मागील वेळेपेक्षादेखील घटले. भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी कामच केले नव्हते. पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात विकास ठाकरे हे स्वत: येथून आमदार असल्याने त्यांनी गडकरींना तगडी स्पर्धा दिली. येथे गडकरींना ६ हजार ६०४ मतांची आघाडी मिळाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. हे पाहून शहर भाजप ॲक्शन मोडमध्ये आला. शहर भाजप अध्यक्ष बंटी कुकडे यांनी ८ जुलै रोजी मंडल अध्यक्ष विनोद कान्हेरे यांना पत्र लिहून २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत २०२४ मध्ये पक्षाची कामगिरी चांगली नसल्याचा मुद्दा मांडला. अशा स्थितीत संपूर्ण बूथ प्रमुख व शक्तीप्रमुख यंत्रणा बरखास्त करावी. परिस्थितीचे निरीक्षण करून २५ जुलैपर्यंत नवीन नियुक्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लवकरच इतर विधानसभा क्षेत्रातदेखील अशीच कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

सक्रिय कार्यकर्त्यांना संधी मिळणार

शहराध्यक्षांच्या सूचनेनंतर बूथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख व त्यांची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याचे पश्चिम नागपूर भाजपचे प्रमुख विनोद कान्हेरे यांनी सांगितले. मात्र, सध्या कार्यकर्ते मतदार नोंदणी मोहिमेत व्यस्त आहेत. या मोहिमेत चांगले काम करणाऱ्यांना आणखी एक संधी दिली जाणार आहे. संघटना सक्रिय करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. लवकरच नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

उर्वरित मंडळात पुनर्रचना

शहरातील उर्वरित पाच मंडळांनादेखील तसे पत्र देण्यात आले. मात्र यामध्ये बडतर्फीचा उल्लेख नाही. २५ जुलैपर्यंतच बुथप्रमुखांची पुनर्रचना करण्यास सांगितले आहे. या पत्रात चांगले काम करणाऱ्यांना संधी द्यावी व निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना हटवावे, असे सांगण्यात आले आहे.

Web Title: As Nitin Gadkari faced low majority in the Lok Sabha West Nagpur booth chief dismissed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.