तिकीट न मिळाल्याने आ. खोपडेंच्या मुलाचा राजीनामा; काँग्रेसने दिली प्रवेशाची ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 15:19 IST2026-01-01T15:18:59+5:302026-01-01T15:19:52+5:30
Nagpur : महापालिकेचे तिकीट न मिळाल्याने भाजपचे आ. कृष्णा खोपडे यांचे पुत्र रोहित यांनी पक्षाचा राजीनामा दिला. आता काँग्रेसने रोहित यांना काँग्रेस प्रवेशाची ऑफर दिली आहे.

AIADMK member Khopde's son resigns after not getting ticket; Congress offers him entry
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेचे तिकीट न मिळाल्याने भाजपचे आ. कृष्णा खोपडे यांचे पुत्र रोहित यांनी पक्षाचा राजीनामा दिला. आता काँग्रेसने रोहित यांना काँग्रेस प्रवेशाची ऑफर दिली आहे. रोहित यांनी भाजपचा राजीनामा दिल्यामुळे त्यांचा वडिलांच्या नेतृत्वावर भरोसा राहिलेला नाही, हे सिद्ध होते. त्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये यावे, त्यांना प्रदेश युतक काँग्रेसमध्ये मोठे पद दिले जाईल, असा चिमटा काढत आ. वंजारी यांनी आ. खोपडे यांना पुन्हा डिवचले आहे.
आ. वंजारी म्हणाले, पूर्व नागपुरातील चेतना टांक, मनोज चाफले, मनीषा धावडे, देवेंद्र मेहेर, अशा अनेक नगरसेवकांचे तिकीट कापण्यात आले. यातील काही नगरसेवक तीन टर्मपासून विजयी होत होते. ते आपल्याला डोईजड होतील, या भीतीमुळे आ. खोपडे यांनी आताच त्यांचा पत्ता साफ केला. पूर्व नागपुरातील भाजपमध्ये अस्वस्थता वाढली आहे. जसजशी मतदानाची वेळ जवळ येईल तसतशी नाराजी उफाळून येईल.
अनेक नाराजांनी उघडपणे काँग्रेसशी हातमिळवणी करण्याचा निश्चय केला आहे. याचा परिणाम महापालिकेच्या निवडणुकीत दिसून येईल. आ. खोपडे यांच्या अरेरावीला त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते तर कंटाळले आहेतच; पण जनताही कंटाळली आहे. या विरोधात आवाज उठविणाऱ्यांना काँग्रेसमध्ये सन्मानाचे स्थान दिले जाईल, असेही आ. वंजारी यांनी सांगितले.