I am sad to see the ganesh naik from left the program; Jayant patil ncp | नाईकांना जाताना पाहून मला दु:ख झालं, जयंत पाटलांची खोचक टीका

नाईकांना जाताना पाहून मला दु:ख झालं, जयंत पाटलांची खोचक टीका

ठाणे - जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत रविवारी ठाण्यात झालेल्या कार्यक्रमामध्ये दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीतून भाजपामध्ये डेरेदाखल झालेले माजी मंत्री गणेश नाईक यांना अपमानाचे घोट पचवावे लागले. व्यासपीठावर स्थान न मिळाल्याने त्यांनी मुलगा संजीवसोबत कार्यक्रम स्थळावरून काढता पाय घेतला. मात्र, एका वृत्तवाहिनीशी बोलताना अपमान झाल्याच्या वृत्ताचं त्यांनी खंडन केलं आहे. पण, राष्ट्रवादीच्या नेत्यांना नाईक यांची अनुपस्थिती खटकली आहे.  

भाजपाच्या कार्यक्रमात गणेश नाईक यांच्यासारखीच अवस्था माजी खासदार किरीट सोमय्या यांचीही झाली. व्यासपीठावर जागा न मिळाल्याने ते चक्क पायऱ्यांवर बसून होते. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या भाषणाचे आयोजन ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी भाजपमध्ये नुकतेच आलेले असा खोचक उल्लेख गणेश नाईक यांचे नाव घेताना केला. त्यावेळी गणेश नाईक कार्यक्रमस्थळी दाखल झाले होते. परंतु व्यासपीठावर त्यांच्यासाठी जागाच नसल्याचे त्यांना कार्यकर्त्यांकडून कळले. त्यामुळे त्यांनी तेथून लगेचच काढता पाय घेतला. नाईक यांच्या या अपमानाचं दु:ख राष्ट्रवादीच्या नेत्यांना झालं आहे. त्यामुळेच, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करुन नाईक यांच्या व्यासपीठावर नसल्याबद्दल ट्विट केलं आहे. 

''व्यासपीठावर जागा न मिळाल्याने गणेश नाईक यांना कार्यक्रमातून जाताना पाहून मला दुःख वाटले. गणेश नाईक यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला व्यासपीठावर जागा न देणारी भाजपा ही खऱ्या अर्थाने 'पार्टी विद डिफ्रन्स' आहे.'', असे ट्विट जयंत पाटील यांनी केलं आहे.  
दरम्यान, अडचणीच्या वेळी केवळ सत्तेसाठी पक्ष सोडून जाणारे पळपुटे आहेत. त्यांना जनता माफ करणार नाही. मागील निवडणुकीत मंदा म्हात्रे जिंकल्या होत्या. नाईक यांना त्यांच्याच चुकीमुळे पराभव पत्करावा लागला. त्यानंतर कुठे तरी सुधारणा होईल, असे वाटत होते. मात्र पक्ष बदलून त्यांनी पुन्हा मोठी चूक केली आहे. चुकीला जनता कधीच माफ करीत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गणेश नाईक यांच्या पक्षांतराचा समाचार घेतला.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: I am sad to see the ganesh naik from left the program; Jayant patil ncp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.