BMC Election Results 2026 : "महापौर कुणाचा बसवायचा याचं आयत्या वेळी गणित जुळवण्यासाठीच..."; रोहित पवारांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 11:20 IST2026-01-16T11:18:08+5:302026-01-16T11:20:36+5:30
BMC Election Results 2026 And Rohit Pawar : रोहित पवार यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत.

BMC Election Results 2026 : "महापौर कुणाचा बसवायचा याचं आयत्या वेळी गणित जुळवण्यासाठीच..."; रोहित पवारांचा गंभीर आरोप
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यामधील ४६ जागांचे कल आता समोर आले आहेत. त्यामध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीने आघाडी घेतली आहे. तर ठाकरे बंधूंची युती कडवी झुंज देत आहे तसेच काँग्रेसनेही काही जागांवर आघाडी घेत खातं उघडलं आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
"निवडणूक आयोगाचा हा असा कारभार पहिल्यांदाच बघायला मिळत असून कदाचित महापौर कुणाचा बसवायचा याचं आयत्या वेळी गणित जुळवण्यासाठीच तर ही टक्केवारी जाहीर करण्याचं टाळलं जात नाही ना?" असं म्हणत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे.
काही वेळातच मतमोजणीला सुरवात होईल, तरीही निवडणूक आयोगाने मुंबईसह अनेक महापालिकांच्या मतदानाची अधिकृत टक्केवारी अद्यापही जाहीर केलेली नाही.. निवडणूक आयोगाचा हा असा कारभार पहिल्यांदाच बघायला मिळत असून कदाचित महापौर कुणाचा बसवायचा याचं आयत्या वेळी गणित जुळवण्यासाठीच तर ही टक्केवारी…
\— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 16, 2026
"काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होईल, तरीही निवडणूक आयोगाने मुंबईसह अनेक महापालिकांच्या मतदानाची अधिकृत टक्केवारी अद्यापही जाहीर केलेली नाही.. निवडणूक आयोगाचा हा असा कारभार पहिल्यांदाच बघायला मिळत असून कदाचित महापौर कुणाचा बसवायचा याचं आयत्या वेळी गणित जुळवण्यासाठीच तर ही टक्केवारी जाहीर करण्याचं टाळलं जात नाही ना? आता टक्केवारी जाहीर करायची की नाही हे निवडणूक आयोगाने ठरवावं, पण किमान आम्ही भाजपाची B-Team आहोत हे तरी मग जाहीर करावं!" असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
BMC निकालाबाबत मोहित कंबोज यांचा मोठा दावा; ठाकरे गटाचं जोरदार प्रत्युत्तर, मांडली क्रोनोलॉजी
मतमोजणीच्या पहिल्या अर्ध्या तासानंतर समोर आलेल्या कलांमध्ये भाजपा आणि शिंदेसेनेच्या युतीने ४६ पैकी २७ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामध्ये भाजपा १५ आणि शिंदेसेने १२ जागांवर आघाडीवर आहे. तर ठाकरे बंधूंच्या युतीने १६ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यात उद्धवसेना ११ आणि मनसे ५ जागांवर आघाडीवर आहे. तर वंचितसोबत आघाडी करून लढणाऱ्या काँग्रेसनेही ३ जागांवर आघाडी घेतली आहे.
मुंबईत समाधान सरवणकर पिछाडीवर, ठाकरेंच्या निशिकांत शिंदेंची आघाडी
मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी काल सुमारे ५२.९४ टक्के एवढं मतदान झालं होतं. तर मतदानानंतर समोर आलेल्या सर्वच एक्झिट पोलमधून मुंबईमध्ये भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर ठाकरे बंधूंच्या युतीला १०० च्या आत जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता.