"कार्यकर्ते तुमचे गुलाम नाहीत"; बाळासाहेबांचं नाव घेत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना बरंच सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 15:43 IST2026-01-08T15:27:05+5:302026-01-08T15:43:51+5:30
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत त्यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली.

"कार्यकर्ते तुमचे गुलाम नाहीत"; बाळासाहेबांचं नाव घेत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना बरंच सुनावलं
Eknath Shinde On Uddhav Thackeray: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आखाड्यात आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. शिवसेनेतील ऐतिहासिक बंडानंतर झालेल्या निवडणुकीत गद्दार, ५० खोके या शब्दांवरून मोठे रणकंदन माजले आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून सातत्याने होणाऱ्या जहरी टीकेला आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीद्वारे सडेतोड उत्तर दिले असून, ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर गंभीर ताशेरे ओढले आहेत.
पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर गद्दार हा शिक्का मारण्याचा प्रयत्न केला. बोल भिडूशी यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे हे कार्यकर्त्यांना आपले गुलाम समजत असल्याचे म्हटलं. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तसे नव्हते. बाळासाहेबांनी शिवसैनिकाला नेहमी प्रेम आणि आपुलकी दिली, पण उद्धव ठाकरेंमध्ये कमालीचा अहंकार भरला आहे. त्यांच्या याच अहंकारामुळे आज शिवसेनेची ही अवस्था झाल्याचेही एकनाथ शिंदे म्हणाले.
"उद्धव ठाकरे स्वतःला मालक समजतात आणि कार्यकर्त्यांना गुलाम समजतात. बाळासाहेब ठाकरे सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे तसे हे सहकाऱ्यांना घरगडी समजतात. हा फरक आहे. कोविडमध्ये रस्त्यावर आम्हीच फिरत होतो, पीपीई कीट घालून आम्ही रुग्णालयात जात होतो. तुम्ही तर मास्क लावून घरातच बसला होता. पण कार्यकर्त्यामुळे पक्ष मोठा होतो हे मानणारा मी आहे. पण त्यांना हेच मान्य नाही. कार्यकर्ता आमच्यामुळे जिवंत आहे असं त्यांना वाटतं. त्यामुळे ते मिंधे, गद्दार अशी दुषणे लावतात," असे एकनाथ शिंदे म्हणाले.
लोकांना विकास हवाय आणि तो घरी बसून होत नाही
"मला असं वाटतं की यांना सर्वसामान्य कार्यकर्ता मोठा पदावर गेलेला आवडत नाही. एका शेतकऱ्याचा मुलगा, सर्वसामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री बनतो याचा अभिमान पाहिजे परंतु यांना अहंकार आहे. म्हणून त्यांना सगळीकडे एकनाथ शिंदेंच दिसतो. माझ्यावर जेव्हा खालच्या पातळीवर टीका होते त्याचवेळी मी प्रत्युत्तर देतो. ते जेवढी टीका करत आहेत तेवढा मी मजबूत होतोय. लोकांमधून मला सहानुभूती मिळतेय. कारण तुम्ही मुख्यमंत्री झाले हे स्वीकारतच नाही. कुणीही मुख्यमंत्री चालेल पण एकनाथ शिंदे होता कामा नये हा द्वेष आहे. राजकारणात एवढा द्वेष चांगला नसतो. मी त्यांच्या टीकेला, आरोपांना कामातून उत्तर दिलं आहे. लोकांना काम आणि विकास हवा असतो आणि तो घरी बसून होत नाही," अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
पक्ष फोडला हा आरोप आम्ही मान्य नाही
तीन वर्षांपूर्वी झालेल्या शिवसेनेतील बंडाचा संदर्भ देत एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका मांडली. "आम्ही पक्ष फोडला नाही तर पक्षाची विचारधारा वाचवली. सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी त्यांनी पक्ष फोडण्याचे काम केलं. बाळासाहेबांनी काँग्रेस वर्ज होती आणि हे त्यांच्यासोबतच गेले. तेव्हाच पक्ष फुटला. आम्ही पक्ष एकसंध ठेवला, धनुष्यबाण गहाण टाकला होता तो आम्ही सोडवला. त्यामुळे पक्ष फोडला हा आरोप आम्ही मान्य केलेला नाही. आम्ही घेतलेला निर्णय लोकांनी मान्य केला. म्हणून आम्ही विधानसभेला ८० उमेदवार लढवून ६० जिंकून आले. विरोधक रोज आमच्या नावाने खडे फोडतात पण आम्ही त्याकडे लक्ष देत नाही. माझा फोकस कामावर असतो," असेही एकनाथ शिंदे म्हणाले.