Tanhaji The Unsung Warrior: Sharad Kelkar was SHOCKED when director Om Raut asked him to play Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख ऐकला, अन्...; शरद केळकरने सांगितली 'तान्हाजी'च्या सेटवरची गोष्ट

छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख ऐकला, अन्...; शरद केळकरने सांगितली 'तान्हाजी'च्या सेटवरची गोष्ट

सुर्वणा जैन

मराठी सिनेरसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेला शरद केळकर रुपेरी पडद्यावरही हिट ठरला. मात्र त्याच्या कारकिर्दीतील सगळ्यात लक्षवेधी भूमिका त्याने साकारली, ती 'तान्हाजी द अनसंग वॉरियर'मध्ये. या सिनेमात शरदने साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सगळ्यांनाच भावली. या भूमिकेवर कौतुकाचा वर्षाव झाला. आता हाच सिनेमा स्टार गोल्ड चॅनलवर 15 ऑगस्टला रसिकांच्या भेटीला येतोय. यानिमित्ताने शरद केळकरशी साधलेला हा संवाद...

 

* छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारायला मिळणं अनेक कलाकारांचं स्वप्न असतं. तानाजी सिनेमामुळे ते स्वप्न पूर्ण झालंय. हा अनुभव कसा होता आणि व्यक्ती म्हणून किती समृद्ध करणारा होता?


>> ओम राऊतने ज्यावेळी मला तान्हाजी सिनेमासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारायची आहे असं सांगितलं तो क्षण माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का होता. ऐतिहासिक भूमिका आणि तीही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याची संधी मिळेल असा कधी विचारही केला नव्हता. त्यामुळे ही भूमिका माझ्या वाट्याला येणं हे मी माझं भाग्य समजतो. आजही अनेकजण मलाही आऊटसाईडर अशाच दृष्टिकोनातून पाहतात. मात्र ओम राऊत त्याच्या मतावर ठाम होता. त्यामुळेच ज्यावेळी लूक टेस्ट झाली त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा मिळताजुळता माझा लूक पाहून मला अतिशय आनंद झाला. छत्रपती शिवाजी महाराज हे साऱ्यांचे दैवत आहे. त्यामुळे माझ्यावर थोडंसं दडपण होतं. या भूमिकेने रसिकांचंही भरभरून प्रेम मिळवून दिलं. एक कलाकार म्हणून हा अनुभव शब्दांत व्यक्त करणं अशक्यच आहे. माझा डायलॉग सुरू होण्याआधी रसिकांची मिळणारी दाद परमोच्च आनंदाचा क्षण होता. या भूमिकेनं मला सर्वार्थानं समृद्ध केलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

* छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला खरंच समजले आहेत का?


>> आपला महाराष्ट्र खूप सुंदर आहे. युरोपपेक्षाही आपला महाराष्ट्र सुंदर आणि संपन्न आहे. बाहेर फिरण्यापेक्षा महाराष्ट्रात फिरलं की या सुंदरतेची जाणीव होते. या महाराष्ट्राला सुंदर बनवलंय आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या गड किल्ल्यांनी. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, त्यांच्या नावाचा जयघोष करतो, मात्र खरंच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज समजले आहेत का, असा प्रश्न कधी कधी निर्माण होतो. कारण गडकिल्ल्यांसारखं वैभव शिवरायांनी आपल्याला दिलंय. त्यांनी उभारलेलं हे वैभव जपणं, त्याचं संवर्धन करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. मात्र या गडकिल्ल्यांकडे आपल्या साऱ्यांचं दुर्लक्ष होतंय. आता मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून या गोष्टी समोर येऊ लागल्यात. तेव्हा कुठे त्याचं संवर्धन आणि नूतनीकरण केलं जात आहे. काही दिवसांपूर्वी पावसामुळे विजयदुर्ग किल्ल्याचा भाग कोसळला. ही बाब माध्यमांमधून आणि सोशल मीडियातून समोर आल्यानंतर त्यांची दखल घेऊन दुरुस्ती करण्यात येणार आहे.    

* छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरुन राजकारण होतं का? त्यावर आपलं काय मत आहे?


>> छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून राजकारण करण्यात काहीही अर्थ नाही. राजकारण करणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज समजलेच नाहीत असं मी मानतो. त्यातच शिवरायांचा अनादर करणाऱ्यांना शिवराय काय होते हे कदाचित माहीतच नसेल. त्यामुळे अशा व्यक्तींवर न चिडता त्यांना प्रेमाने समजावून सांगितलं पाहिजे या मताचा मी आहे. 'तान्हाजी' सिनेमाच्या प्रमोशनच्या वेळी असाच एक प्रसंग घडला होता. त्यावेळी एका व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणं मला अजिबात पटलं नव्हतं. त्यावेळी मी आरडाओरडा न करता प्रेमाने समजावून सांगितले. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना समजलेत त्यांनी एकेरी उल्लेख न करता छत्रपती शिवाजी महाराज असं सन्मानाने बोलायला सुरुवात केली. त्यामुळे कोणतीही गोष्ट प्रेमाने समजावून सांगा, लोक ती स्वीकारतात आणि बदलही घडतो असं मी मानतो.  

* सध्या चित्रपटसृष्टीत घराणेशाहीची चर्चा आहे. त्यावर काय भूमिका आहे ?


>> चित्रपटसृष्टीतील घराणेशाहीला बऱ्याच अंशी रसिक जबाबदार आहे असं मला वाटतं. कारण कोणत्याही कलाकाराला रसिकच मोठं करतात. यात बाहेरुन आलेला असो किंवा मग इथला; कलाकारांचं भवितव्य रसिक ठरवतात. आता हेच पाहा, बाहेरून आलेल्या कलाकारांच्या नावाने शिमगा करणारे त्यांचे सिनेमे जाऊन पाहतात. त्यामुळे त्यांचे सिनेमे हिट होतात, त्यांना फॅन फॉलोईंग मिळतो आणि नवनवे सिनेमे त्यांच्या पदरात पडतात. जर तुम्हाला एखादा कलाकार बाहेरचा आहे असं वाटतं, तर तुम्ही त्यांचे सिनेमा पाहू नका. त्यानंतर तो हिट झाला तर मग आरडाओरडा कशाला करायचा? महत्त्वाची गोष्ट म्हणजे घराणेशाहीमधून येणारे प्रत्येक कलाकार हिट होतातच असे नाही. प्रत्येकाला संघर्ष हा करावाच लागतो. आता हेच पाहा रणबीर कपूर किती चांगला आणि गुणी कलाकार आहे. त्याचे वडीलही उत्तम आणि प्रसिद्ध अभिनेते होते. रणबीरचा लूक चांगला, त्याचा अभिनय चांगला, त्याचा डान्स चांगला आणि त्याला अभिनयाचा वारसा त्याला घरातून लाभला असला तरी त्याने स्वतःला सिद्ध केले आहे. त्यामुळे अभिनय कौशल्य असेल ते कलाकार हिट होतातच. पूर्वीच्या काळात अनेक निर्मात्यांची मुलं मुली सिनेमात आले. मात्र त्यांचे सिनेमे म्हणावे तसे चालले नाहीत. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर बनला तरी मुलाला स्वतःला सिद्ध करावे लागते. त्याच्यात कौशल्य नसेल तर कुणी पेशंट त्याच्याकडे का येतील. तसंच कलाकारांचं आहे. घराणेशाही वाटत असली तरी कलाकारांच्या अभिनयावर सगळं असतं आणि ते ठरवण्याचा अधिकार मायबाप रसिकांच्या हातात आहे असं मी मानतो. सिनेमा आणि कलाकारांबाबत आवडनिवड ठरवणे हे सर्वस्वी रसिकांच्या हातात आहे. जेव्हा रसिक योग्य विचार करतील त्याचवेळी बदल घडलेला पाहायला मिळेल.


* 'तान्हाजी' सिनेमाच्या निमित्ताने रसिकांना काय सांगाल?


>> 15 ऑगस्टला सिनेमा रसिकांना पाहाता येणार आहे. माझी एक विनंती आहे की तुम्ही तिरंगा हातात घेऊन, पांढरे कपडे परिधान करून तान्हाजी पाहतानाचा फोटो काढा आणि सोशल मीडियावर पोस्ट करा. शिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की, हा सिनेमा स्टार गोल्डवर हिंदीसोबतच मराठी भाषेतही पाहता येणार आहे. रसिकांना हा सिनेमा कोणत्या भाषेत पाहायचा आहे ते फक्त सिलेक्शन करायचे आहे. कारण याआधी हा सिनेमा ज्यावेळी छोट्या पडद्यावर आला त्यावेळी तो फक्त हिंदीतच दाखवण्यात आला. त्यामुळे मराठी रसिकांचा हिरमोड झाला. आपल्या इतिहासाची कथा आपल्या भाषेत पाहता आली नसल्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. आता मात्र रसिकांची हीच नाराजी दूर करण्यात आली आहे. 15 ऑगस्टला तान्हाजी तुम्ही आपल्या मायबोली मराठी भाषेतही पाहू शकणार आहात.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Tanhaji The Unsung Warrior: Sharad Kelkar was SHOCKED when director Om Raut asked him to play Chhatrapati Shivaji Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.