आसूडमधून 'ही' अभिनेत्री करतेय मराठी सिनेसृष्टीत पदार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 03:58 PM2019-02-01T15:58:42+5:302019-02-01T16:09:37+5:30

‘आसूड’ हा केवळ शेतकऱ्यांसाठी निर्माण केलेला चित्रपट नसून प्रत्येक अन्यायग्रस्त व्यक्तीला अन्यायाविरोधात लढा देण्याची प्रेरणा देणारा चित्रपट आहे.

rashmi rajput will her debut in marathi industry from aasud movie | आसूडमधून 'ही' अभिनेत्री करतेय मराठी सिनेसृष्टीत पदार्पण

आसूडमधून 'ही' अभिनेत्री करतेय मराठी सिनेसृष्टीत पदार्पण

googlenewsNext
ठळक मुद्देदिग्दर्शकाच्या कल्पनेतलं लाखापूर वसवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.शिवाजी पाटीलच्या संघर्षाच्या प्रवास ‘आसूड’ चित्रपटातून दिसणार आहे.

चित्रपट हे माध्यम मनोरंजनासोबतच एखादा विषय परिणामकारकरित्या लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी सुद्धा वापरला जातो. कोणताही क्लिष्ट विषय चित्रपटाच्या माध्यमातून अधिक सहजरित्या लोकांपर्यंत पोहोचतो आणि म्हणूनच आजही अनेक राजकीय चित्रपटांना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो. कोणताही भारतीय माणूस राजकारणावर भाष्य केल्याशिवाय राहू शकत नाही. कमी अधिक प्रमाणात राजकारण हा प्रत्येकाच्या इंटरेस्टचा विषय असतो. त्यामुळेच ‘सामना’, ‘सिंहासन’ पासून ‘झेंडा’ पर्यंत अनेक राजकीय चित्रपट यशस्वी झाले. येत्या ८ फेब्रुवारीला ‘आसूड’ या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने आणखी एक राजकीय थरारपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या चित्रपटाबद्दल बोलताना निर्माते डॉ. दीपक मोरे सांगतात की ‘आसूड’ हा चित्रपट म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड करणाऱ्या एका तरुण युवकाची संघर्षगाथा आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींवर राजकारण, राजकीय घटक आणि राजकीय योजनांचा प्रभाव पडत असतो आणि आपल्या आजूबाजूला छोट्या गल्ल्यांमध्ये घडणाऱ्या असंख्य घटनांचे पडसाद थेट दिल्लीतल्या राजकारणात उमटत असतात. पण या सगळ्यांपासून अनेकदा आपण अनभिज्ञ असतो. या संपूर्ण राजकीय प्रक्रियेचे चित्रण करत, गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या राजकारणाची एक एक कडी उलगडत ‘आसूड’ चित्रपटाची कथा पुढे जाते.

शासन आणि धनाढ्य व्यावसायिक यांच्यातल्या आर्थिक संबंधांमुळे समाजातल्या सामान्य लोकांची कशी फरपट होते? व्यावसायिकांच्या हितार्थ स्वीकारलेल्या आर्थिक धोरणांमुळे इतर सामाजिक घटकांवर त्याचे काय विपरीत परिणाम होतात? या सगळ्यापासून अजाण असलेल्या जनतेला जागं करण्यासाठी धडपडणाऱ्या शिवाजी पाटील च्या संघर्षाच्या प्रवास ‘आसूड’ चित्रपटातून दिसणार आहे.

‘आसूड’ हा केवळ शेतकऱ्यांसाठी निर्माण केलेला चित्रपट नसून प्रत्येक अन्यायग्रस्त व्यक्तीला अन्यायाविरोधात लढा देण्याची प्रेरणा देणारा चित्रपट आहे. छोट्या छोट्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी स्वतःच्या हक्कांसाठी दरवेळी संप, आंदोलन, मोर्चा या गोष्टींचा आधार घेण्याची गरज सर्वसामान्य जनतेला लागू नये, त्यांच्यासाठी निर्माण केल्या जाणाऱ्या योजना, सोयी-सुविधा सहजरीत्या त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात, राजकारण आणि समाजकारण यातली दरी कमी करून समाजातील प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल अशा अनेक मुद्द्यांना ‘आसूड’ चित्रपट स्पर्श करतो.

‘आसूड’ हा एक चौकटीपलीकडचा चित्रपट आहे. राजकीय चित्रपट म्हणजे निव्वळ राजकारण हे समीकरण या चित्रपटाने बदलले आहे. मराठी राजकीय चित्रपटांची चौकट मोडत, प्रादेशिक राजकारणाची सीमा ओलांडत थेट दिल्लीच्या राजकारणावर हा चित्रपट भाष्य करतो. म्हणूनच ‘आसूड’ चित्रपटात नामवंत मराठी अभिनेत्यांसोबत प्रसिद्ध हिंदी कलाकारसुद्धा दिसतात.

भारताच्या राजकारणात जो घटक अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ज्याची  ख्याती आहे अशा माध्यमव्यवस्थेचा चेहराही ‘आसूड’ चित्रपट प्रेक्षकांसमोर आणतो. राजकारण्यांमुळे माध्यमांची गळचेपी होत आहे? की माध्यमे आणि सरकार यांची अंतर्गत हातमिळवणी झालेली आहे? या प्रश्नांवर ‘आसूड’ चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे.

चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी केवळ भव्यदिव्य लोकेशन्स न निवडता दिग्दर्शकाच्या नजरेतला सिनेमा चित्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी सुरुवातीच्या काळात भोर, मुंबई या ठिकाणी चित्रिकरण करायचे ठरवले होते. पण कथेला साजेशी लोकेशन्स तिथे आम्हाला मिळाली नाहीत म्हणून अमरावती, नागपूर, अकोला आणि सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी निसर्गाच्या सुंदर बॅकड्रॉप वर आम्ही ‘लाखापूर’ गावाचा सेट उभारला. दिग्दर्शकाच्या कल्पनेतलं लाखापूर वसवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. गाणी आणि साहसी दृश्यांच्या चित्रिकरणासाठीसुद्धा आमच्या संपूर्ण टीमने अपार मेहनत घेतली आहे, त्यामुळेच गावकुसापासून दिल्लीपर्यंतच्या घटना चित्रपटात दाखवणे आव्हानात्मक असूनही आम्ही ते यशस्वीरित्या करू शकलो याचे आम्हाला समाधान आहे. निर्मितीमूल्याकडेही  ‘आसूड’ चित्रपटात कटाक्षाने लक्ष दिले गेले आहे.  

गोविंद प्रोडक्शन प्रस्तुत ‘आसूड’ चित्रपटाची निर्मिती डॉ.दीपक मोरे यांची असून सहनिर्मिती विजय जाधव यांची आहे. लेखन व दिग्दर्शन निलेश रावसाहेब जळमकर तर सहदिग्दर्शन अमोल ताले यांचे आहे. कथा–पटकथा आणि संवाद निलेश रावसाहेब जळमकर व अमोल ताले यांचे आहेत. छायांकन अरुण प्रसाद यांनी केले असून संकलन सचिन कानाडे यांचे आहे.  विक्रम गोखले, प्रदीप वेलणकर, माधव अभ्यंकर, अनंत जोग, दीपक शिर्के, उपेंद्र दाते, संदेश जाधव, कमलेश सावंत यांच्यासोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचा ठसा उमटवणारे राणा जंगबहादूर, अवतार गील हे नामवंत कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. त्यांच्यासोबतच अमित्रीयान पाटील आणि रश्मी राजपूत ही जोडी या चित्रपटात झळकणार आहे.

विशेष म्हणजे आजवर असंख्य हिंदी चित्रपटांतील गाण्यांना आवाज व संगीत देणारे राष्ट्रीय पारितोषिक आणि फिल्मफेअर अॅवॉर्ड विजेते संगीतकार अनु मलिक ‘आसूड’ या आगामी मराठी चित्रपटात आपल्या संगीताची जादू दाखवणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी प्रथमच मराठीत पाऊल ठेवलं आहे.

दैनंदिन आयुष्याशी निगडीत असलेला एक अत्यंत महत्त्वाचा विषय मांडणारा, प्रस्थापित समाजव्यवस्थेच्या आणि माध्यमव्यवस्थेच्या चौकटी मोडणारा ‘आसूड’ हा एक चौकटीपलीकडचा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी राजकीय थरारपट आम्ही मोठ्या पडद्यावर घेऊन आलो आहोत. त्यामुळे प्रेक्षकांनी ‘आसूड’ चित्रपट येत्या ८ फेब्रुवारीला चित्रपटगृहात जाऊन आवर्जून बघा, असे आवाहन चित्रपटाचे निर्माते डॉ. दीपक मोरे यांनी केले आहे. 

Web Title: rashmi rajput will her debut in marathi industry from aasud movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.