ठळक मुद्देआदेश सुचित्रा यांना पाहताच क्षणी त्यांच्या प्रेमात पडले होते. त्यामुळे सुचित्रा यांच्या शाळेच्या परिसरात आदेश अनेक वेळा जात असत.

महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. आदेश सोशल मीडियावर त्यांच्या कुटुंबियांचे, त्यांचे फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असतात. त्यांनी नुकताच त्यांचा आणि त्यांची पत्नी सुचित्रा बांदेकर यांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यांच्या या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

आदेश आणि सुचित्रा यांचे कपल त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडप्यांमध्ये त्यांची गणना केली जाते. आदेश आणि सुचित्रा गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपट, मालिकांमध्ये काम करत आहेत. त्यांच्या लग्नाला 30 हून अधिक वर्षं झाले असून त्यांना मुलगा देखील आहे. त्यांच्या मुलाचे नाव सोहम आहे. 

आदेश आणि सुचित्रा यांची प्रेमकथा ही अतिशय फिल्मी आहे. सुचित्रा केवळ नववीत असल्यापासून आदेश यांना खूप आवडत होत्या. रथचक्र या मालिकेत सुचित्रा काम काम करत होत्या. या मालिकेच्या एका भागात आदेश यांनी काम केले होते. आदेश सुचित्रा यांना पाहताच क्षणी त्यांच्या प्रेमात पडले होते. त्यामुळे सुचित्रा यांच्या शाळेच्या परिसरात आदेश अनेक वेळा जात असत. त्यांना पाहून माझा पाठलाग करू नकोस, मी काही तुला होकार देणार नाही असे सुचित्रा यांनी सांगितले होते. पण आदेश यांनी सुचित्रा यांना दादरच्या एक हॉटेलमध्ये भेटायला बोलवले. सुचित्रा आदेश यांना भेटायला जाण्यासाठी एका मैत्रिणीला सोबत घेऊन निघाल्या. पण त्यांना भीती वाटत असल्याने त्या हॉटेलमध्ये न जाता दादरमध्ये दुसरी कडेच फिरत राहिल्या. 

आदेश त्यांची अनेक तास वाट पाहत बसले होते. पण त्या काही आल्या नाहीत. त्यामुळे शेवटी आदेश सुचित्रा यांच्या घरी गेले. पण सुचित्रा घरी पोहोचल्याच नव्हत्या. काहीच वेळात त्या घरी आल्या आणि आदेश यांना आपल्या घरात पाहून त्यांना चांगलाच धक्का बसला. आदेश मस्त त्यांच्या आईशी गप्पा मारत होत्या. त्यानंतर सुचित्रा यांच्या आईला बाहेर जायचे होते, म्हणून आदेश आईसोबतच निघाले. पण बस स्टॉपला गेल्यावर मला एक काम आहे असे कारण देत तिथून निघून गेले आणि त्यांनी थेट सुचित्रा यांचे घर गाठले. सुचित्रा यांनी दरवाजा उघडला तर आदेश खूप चिडलेले होते. मला हो तर हो नाही तर नाही सांग मी तुला पुन्हा विचारणार नाही. आज मी तुला महालक्ष्मीला घेऊन जाणार होतो. मी तुला पाच मिनिटे देतो मला उत्तर दे असे आदेश म्हणाले. त्यावर थोड्याच वेळात महालक्ष्मीला कधी जायचे असे सुचित्राने आदेशला विचारले. आदेश यांनी अशा वेगळ्यात अंदाजात सुचित्राच्या घरात त्यांना प्रपोज केले होते.

सुचित्रा आणि आदेश यांच्या नात्याला सुचित्रा यांच्या घरातून खूप विरोध होता. आदेश त्यावेळी इंडस्ट्रीत स्ट्रगल करत होते. पण घरातल्यांच्या विरोधाला न जुमानता सुचित्राने त्यांच्या सोबत लग्न केले. मी क्लासला जाते असे सांगून त्या घरातून निघून गेल्या आणि त्यांनी बांद्रा कोर्टात जाऊन आदेश यांच्या सोबत लग्न केले. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण त्यांच्या लग्नाचा खर्च केवळ ५० रुपये आला होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: aadesh bandekar and suchitra bandekar love story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.