Malegaon Municipal Corporation Election : मालेगावात भाजपा-शिंदेसेनेची युती अधांतरी, कार्यकर्त्यांत संभ्रम; गिरीश महाजनांना साकडं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 12:12 IST2025-12-27T12:12:00+5:302025-12-27T12:12:13+5:30
Malegaon Municipal Corporation Election : भाजप आणि शिंदेसेना यांच्या युतीतर्फे निवडणूक लढविण्यात येणार असल्याचे वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट केले असले तरी अशी युती होणार का? याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

Malegaon Municipal Corporation Election : मालेगावात भाजपा-शिंदेसेनेची युती अधांतरी, कार्यकर्त्यांत संभ्रम; गिरीश महाजनांना साकडं
मालेगाव येथील महानगरपालिकेच्या २१ प्रभागांमध्ये निवडणूक होत आहे. भाजप आणि शिंदेसेना यांच्या युतीतर्फे निवडणूक लढविण्यात येणार असल्याचे वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट केले असले तरी अशी युती होणार का? याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. भाजपला अधिक जागा मिळाव्यात, अशी कार्यकर्त्यांची मागणी असली तरी वरिष्ठ पातळीवरून होणारा निर्णय मान्य करावा, असा काही सदस्यांचा दबाब आहे. मतविभाजन टाळण्यासाठी युती करावी, अशी मागणीही केली जात आहे.
मनपासाठी आठ वर्षांच्या अवकाशानंतर निवडणूक होत असल्याने सर्वच पक्षांकडून निवडणूक लढविणा-य इच्छुकांची संख्या मोठी आहे. महायुती व महाविकास आघाडीतून या निवडणुकांना सामोरे जाण्याचे संकेत वरिष्ठ पातळीवरून दिले जात आहेत, मात्र स्थानिक पातळीवर युतीच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरु झाले असून भाजपमध्ये युती करावी व करू नये असे दोन प्रवाह निर्माण झाले आहेत.
मनपा निवडणुकीसाठी आगामी चार दिवसांत उमेदवार निश्चित करणे आवश्यक आहे. त्यातच एकमेकांविरोधात दोन प्रवाह असल्यामुळे युतीचे गाडे अडलेले आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांची सुनील गायकवाड, प्रमोद बच्छाव, अद्वय हिरे, प्रसाद हिरे, देवा पाटील आदीसह पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली व कार्यकर्त्यांची भावना सांगितली. महाजन यांनी स्थानिक पातळीवर बैठक घेऊन त्यात एकमताने निर्णय घेण्याच्या सूचना केल्याची माहिती मिळाली आहे
भाजपाची १४ जागांची मागणी
भाजपचा युती करण्यास विरोध नाही. पण शिंदेसेना निवडणुकीसाठी भाजपला फक्त ६ जागा देण्यास राजी आहे. मात्र भाजपने १४ जागा द्याव्यात, अशी मागणी केली आहे. असे झाल्यास भाजपला पहिल्यांदा उपमहापौरपद मिळू शकणार आहे. मात्र या जागा न मिळाल्यास युती होणार की नाही, हे अद्यापतरी अधांतरीच आहे.
कार्यकर्त्यांच्या हितासाठी युतीला विरोध
मनपाच्या ८४ जागा असल्यातरी भाजप शिंदेसेनेचे बलस्थान म्हणजे हिंदू मतदार. त्यांचे ५ तर संमिश्रवस्ती असलेले २ प्रभाग आहेत. त्यामधून २६ सदस्य आहेत. युती झाल्यास दोन्ही पक्षांना समसमान जागा वाटप झाल्यास प्रत्येक पक्षाला १३ जागा वाट्याला येतात. या १३ जागांसाठी दोन्ही पक्षांतर्फे इच्छुकांची संख्या लक्षणीय मोठी आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे भाजपाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना काय मिळणार असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे माजी गटनेते सुनील गायकवाड यांनी सांगितले.