अजित पवारांना शून्य, मग एकनाथ शिंदे किती जागा जिंकणार? उद्धव ठाकरेंच्या गोटात खळबळ उडेल असा आकडा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 20:48 IST2024-04-16T20:47:38+5:302024-04-16T20:48:49+5:30
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray Shiv sena Loksabha: अजित पवारांच्या पक्षाला आणि एकनाथ शिंदेंच्या पक्षाला यंदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे.

अजित पवारांना शून्य, मग एकनाथ शिंदे किती जागा जिंकणार? उद्धव ठाकरेंच्या गोटात खळबळ उडेल असा आकडा...
अजित पवारांच्या पक्षाला आणि एकनाथ शिंदेंच्या पक्षाला यंदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे. यापैकी लोकसभेत अजित पवारांना महायुतीत चार जागा सुटल्या असून त्यापैकी एकाही जागेवर त्यांचे उमेदवार जिंकत नसल्याचा ओपिनिअन पोल आला आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला भरघोस यश मिळेल असा आकडा आला आहे.
शिंदे यांच्या शिवसेनेला ९ ते १० जागा जिंकता येतील असा अंदाज एबीपी सीव्होटरच्या फायनल सर्व्हेमध्ये वर्तविण्यात आला आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्याही शिवसेनेला ९ ते १० जागा दाखविण्यात आल्या आहेत. यामुळे शिवसेनेच्या अस्तित्वाच्या लढाईत दोन्ही गटांना १८ ते २० जागा मिळणार आहेत, असे दिसतेय.
महायुती वि. मविआ असा लढा असून महायुतीला ३० व मविआला १८ जागा मिळणार असल्याचे दाखविण्यात आले आहे. यापैकी भाजपला २१-२२ जागा, शिंदे शिवसेनेला 9-10 जागा दाखविण्यात आल्या आहेत. तर मविआमध्ये काँग्रेस ३, ठाकरे गट शिवसेना 09-10 व शरद पवार राष्ट्रवादीला पाच जागा दाखविण्यात आल्या आहेत.
शिंदे यांची शिवसेना ११ ते १३ जागा लढवत आहे. तर उद्धव ठाकरेंची शिवसेना २१ जागा लढवत आहे. यामुळे या ओपिनिअन पोलची आकडेवारी पाहता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट जास्त असणार आहे. शिंदेंचे दोन ते तीन उमेदवार पडण्याची शक्यता आहे, तर ठाकरेंचे निम्म्याहून अधिक उमेदवार पराभूत होताना दिसत आहेत.