मतदानापूर्वीच मनसेत मोठा भूकंप होणार?; भाजपा-शिंदेसेना राज ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 21:16 IST2026-01-07T21:15:26+5:302026-01-07T21:16:05+5:30
जे लोक पक्षात कार्यरत आहेत त्यांना पक्षाबाहेर ढकलण्याचं कटकारस्थान सुरू आहे असा आरोप संतोष धुरी यांनी केला होता.

मतदानापूर्वीच मनसेत मोठा भूकंप होणार?; भाजपा-शिंदेसेना राज ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत
मुंबई- महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्रित निवडणूक लढवत आहेत. त्यात आजपर्यंत एकमेकांच्याविरोधात लढलेले उद्धवसेना आणि मनसे यांच्या युतीमुळे दोन्ही पक्षांमधील नाराजी उफाळून आली आहे. त्यात मनसेला सगळ्यात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांच्यासोबत राहिलेले निष्ठावंत कार्यकर्ते आणि नेते पक्ष सोडण्याच्या उंबरठ्यावर आहेत अशी धक्कादायक माहिती पुढे येत आहे. अलीकडेच संतोष धुरी यांनी भाजपात प्रवेश केला. त्यापाठोपाठ राजा चौगुले, हेमंत कांबळे यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. मात्र मनसेला लागलेली ही गळती थांबण्याची चिन्हे नाहीत.
माहिम भागातील मनसेचे माजी नगरसेवक वीरेंद्र तांडेल यांनीही पक्षातील गटबाजीला कंटाळून राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर संतोष धुरी यांनी मोठं विधान केले. उद्धव ठाकरे यांच्याकडून मनसे हायजॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात बाळा नांदगावकर यांना जबाबदारी दिली आहे. जे लोक पक्षात कार्यरत आहेत त्यांना पक्षाबाहेर ढकलण्याचं कटकारस्थान सुरू आहे. राजा चौगुले, हेमंत कांबळे, वीरेंद्र तांडेल ही नावे आता समोर आली आहेत. परंतु निवडणुकीच्या मतदानापूर्वीच मनसेतील बडे चेहरा पक्ष सोडताना दिसतील असं धुरी यांनी म्हटलं आहे. त्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील संयुक्त सभेनंतर काही मोठी घडामोड घडणार का अशीही राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
संदीप देशपांडे प्रचारातून गायब?
मनसेने मुंबई शहर अध्यक्ष म्हणून संदीप देशपांडे यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. मात्र ऐन निवडणुकीत देशपांडे प्रचारात फारसे सक्रीय नसल्याचे दिसून येत आहे. एरव्ही प्रसार माध्यमात आणि सोशल मीडियातून चर्चेत असणारे संदीप देशपांडे मागील काही दिवसांपासून शांत आहेत. संतोष धुरी यांच्यासह अनेकांना तिकीट न मिळाल्याने संदीप देशपांडे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे १५ तारखेच्या मतदानापूर्वी मनसेत भूकंप घडू शकतो अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. मागील काळात संदीप देशपांडे आणि शिंदेसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्यात बैठका होत असल्याचं पाहायला मिळाले होते. त्यावेळी मनसे-शिंदेसेना एकत्र येतील अशी चर्चा होती परंतु त्यानंतर मनसे-उद्धव ठाकरे एकत्र आले आणि या चर्चेतून संदीप देशपांडे यांना दूर ठेवल्याचा आरोप संतोष धुरी यांनी केला आहे. त्यामुळे संदीप देशपांडे हे मतदानापूर्वीच मुंबईतील नाराज पदाधिकाऱ्यांची फौज घेऊन काही वेगळा निर्णय घेणार का हे काही दिवसांत लोकांसमोर येणार आहे.
युतीत राज ठाकरेंना सर्वात मोठा तोटा होईल, मुख्यमंत्र्यांनी केली भविष्यवाणी
दरम्यान, या निवडणुकीत युतीमुळे राज ठाकरे यांचा सर्वात तोटा होईल हे लिहून घ्या. या युतीत राज ठाकरेंचा फायदा उद्धव ठाकरेंना मिळेल परंतु उद्धव ठाकरेंचा फायदा राज यांना मिळणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. "Raj Thackeray Will Be Biggest Loser" ही माझी भविष्यवाणी आहे. ती निवडणुकीनंतर तुम्ही पाहू शकता असं थेट विधानच देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.