वडिलांच्या पराभवाचा बदला घेणार! वैभव नाईकांना घरी बसविणार; निलेश राणेंचे विधानसभा लढविण्याचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 15:45 IST2024-04-19T15:44:23+5:302024-04-19T15:45:05+5:30
वैभव नाईकांनी २०१४ मध्ये नारायण राणे यांचा १०००० मतांनी पराभव केला होता. राज्यात वैभव नाईक जायंट कीलर ठरले होते. यावेळी नारायण राणे यांनी यापुढे कधीही निवडणूक लढविणार नाही, अशी शपथ घेतली होती.

वडिलांच्या पराभवाचा बदला घेणार! वैभव नाईकांना घरी बसविणार; निलेश राणेंचे विधानसभा लढविण्याचे संकेत
नारायण राणेंच्या उमेदवारीने रत्नागिरी-सिंधुदूर्ग जिल्ह्याचे राजकारण बदलले आहे. सध्याचे खासदार विनायक राऊत यांनी राणे यांचे पूत्र निलेश राणे यांचा दोन वेळा पराभव केला होता. राणे भाजपात आल्याने ही जागा भाजपाने मागितली होती, तर शिंदेंच्या शिवसेनेतून सामंत बंधू इच्छूक होते. अशातच ही जागा राणेंना सुटली असून राणेंचा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे संकेत निलेश राणे यांनी दिले आहेत.
रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघासाठी नाराय़ण राणेंनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी किरण सामंत, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मंत्री रवींद्र चव्हाण तसेच दिपक केसरकर उपस्थित होते. हा अर्ज भरण्यापूर्वीच्या रॅलीवेळी निलेश राणे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राणे आणि सामंत कुटुंबामध्ये दुरावा निर्माण झाला होता, त्याला विनायक राऊत जबाबदार होते, असा आरोप निलेश राणे यांनी केला. दोन्ही जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते रत्नागिरीच्या दिशेने आले आहेत. राणे आणि सामंत कुटुंबाचे जवळचे संबंध आहेत. विनायक राऊत यांनी नारायण राणेंना देवाच्या जागी ठेवले आहे. त्यामुळे राणे या निवडणुकीत जिंकणार आहेत. 4 जूनला राऊतांना नातवंडांसोबत खेळायला मोठ्या सुट्टीवर पाठवणार, असल्याचे निलेश राणे म्हणाले.
याचबरोबर राणे यांनी कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्यावरही टीका केली. याच वैभव नाईकांनी २०१४ मध्ये नारायण राणे यांचा १०००० मतांनी पराभव केला होता. राज्यात वैभव नाईक जायंट कीलर ठरले होते. यावेळी नारायण राणे यांनी यापुढे कधीही निवडणूक लढविणार नाही, अशी शपथ घेतली होती. कणकवली-देवगड मतदारसंघातून नितेश राणे जिंकून आले होते, तर बाजुच्याच मतदारसंघात नारायण राणे पराभूत झाले होते. तरीही पराभव गिळून नारायण राणे नितेश राणेंच्या स्वागताला गेले होते. यावेळी नितेश राणेंच्या डोळ्यातील अश्रू सर्वांनी पाहिले होते. या वैभव नाईकांवर टीका करताना निलेश राणे यांनी मी त्यांना ऑक्टोबरमध्ये घरी बसविणार असल्याचे म्हटले आहे.