नारायण राणेंसोबत फॉर्म भरायला गेले, बाहेर पडताच किरण सामंत म्हणाले, धनुष्यबाण असता तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 16:44 IST2024-04-19T16:44:00+5:302024-04-19T16:44:52+5:30
Kiran Samant: रत्नागिरी-सिंधुदूर्गमध्ये आज राणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत किरण सामंतही उपस्थित होते.

नारायण राणेंसोबत फॉर्म भरायला गेले, बाहेर पडताच किरण सामंत म्हणाले, धनुष्यबाण असता तर...
लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीपासून मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे निवडणूक लढविण्याची तयारी करत होते. शिंदे गटात गेल्यानंतर अनेकदा निलेश राणेंना उमेदवारी मिळू नये म्हणून कधी व्हॉट्सअप स्टेटस तर कधी फेसबुकवर नाराजी व्यक्त करत होते. अशातच निवडणुकीची घोषणा झाल्यावरही सामंत बंधुंनी एवढे ताणून धरले की भाजपाला अगदी शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवार जाहीर करता येत नव्हता. अखेर सामंतांनी माघार घेतल्याचे जाहीर केले तेव्हा कुठे भाजपाचा जीव भांड्यात पडला आणि राणेंची उमेदवारी जाहीर झाली.
रत्नागिरी-सिंधुदूर्गमध्ये आज राणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत किरण सामंतही उपस्थित होते. परंतु बाहेर येताच किरण सामंत यांनी पुन्हा रत्नागिरी सिंधुदूर्गमध्ये लोकसभा मतदारसंघात धनुष्यबाण चिन्ह असतं तर भरपूर मतदान मिळालं असतं, असे सांगत आपली नाराजी वेगळ्या शब्दांत व्यक्त केली.
महायुतीच्या नेत्यांनी यावर बोलू नये, अपशकून करू नये असे राणे यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटले होते. ते किरण आणि उदय सामंत यांच्याबाबतच बोलले होते. नारायण राणेंना हा मतदारसंघ अवघड जाणार, धनुष्यबाण आणि शिवसेना यांचा कोकण बालेकिल्ला आहे. यामुळे इथे याच निशानीवरचा उमेदवार हवा, असे भाजपाच्या नेत्यांना सांगितल्याचे किरण सामंत म्हणाले होते. यावर राणेंची ही प्रतिक्रिया होती.
महाराष्ट्रामध्ये 45 प्लस करण्याकरीता तसेच कुटुंबाशी चर्चा करून माघार घेतली आहे. मी नाराज नाही. या मतदारसंघात धनुष्यबाण चिन्ह असते तर भरपूर मतदान मिळाले असते. भविष्यात सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. कोकणवासियांवर विश्वास आहे ते धनुष्यबाण कधीच विसरणार नाहीत, असे किरण सामंत म्हणाले.
माझा हेतू स्वच्छ होता. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी राहणारच ते सहाजिकच आहे. भारतीय जनता पार्टीच्या बड्या नेत्याने सांगितले म्हणून मी उमेदवारी मागे घेतल्याच ट्विट डिलीट केले होते, असे किरण सामंत म्हणाले.