भाजपाने देशाची लूट करून दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचविले; विजय वडेट्टीवारांचा घणाघाती आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 05:48 PM2024-04-15T17:48:40+5:302024-04-15T17:57:22+5:30

इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत भाजपा सरकारवर साधला निशाणा

Vijay Wadettiwar slams PM Modi led BJP Govt and promotes Mahavikas Aaghadi candidate Dr Namdeo Kirsan  | भाजपाने देशाची लूट करून दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचविले; विजय वडेट्टीवारांचा घणाघाती आरोप

भाजपाने देशाची लूट करून दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचविले; विजय वडेट्टीवारांचा घणाघाती आरोप

Vijay Wadettiwar: गडचिरोली: खोटी आश्वासने, पोकळ वचने देऊन सत्तेत येताच भाजपाने कोलांटी उडी मारली. देशातील प्रत्येक क्षेत्रात प्रचंड लूट माजवून व्यापारी हित जोपासले. आता तर आपकी बार ४०० पारचा नारा देऊन देशाच्या पवित्र संविधानाला बदलून हुकूमशाही आणण्याचा डाव भाजपने आखला आहे. मतदारांनी जागरूक राहून या षडयंत्राला उत्तर देण्यासाठी सज्ज व्हावे. येत्या १९ एप्रिलला इंडिया आघाडीच्या उमेदवाराला विजयी करावे, असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते. यावेळी विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरातही उपस्थित होते.

  • भाजपाने देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले!

विजय वडेट्टीवार म्हणाले, "देशात, बेरोजगारी महागाई प्रचंड प्रमाणात फोफावली असून देशातील शेतकरी कामगार कष्टकरी मजूर व सर्वसामान्य यांना जगणे कठीण झाले आहे. चारशे रुपयाचा गॅस बाराशेवर नेला, रासायनिक खते, युरिया याची प्रचंड दरवाढ केली व वजनातही घट केली. तसेच जीएसटीच्या नावावर प्रत्येक वस्तूवर कर आकारून भाजप सरकारने सर्वसामान्यांवर आर्थिक बोजा वाढवला आहे. तर व्यापारी हित जोपासून देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले. आज देश वाईट परिस्थितीतून जात असून या देशात महिला अत्याचार गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. आता या भाजप सरकारचा देशात धर्मांधता पसरवून देशाचे संविधान बदलविण्याचा डाव आहे. गेल्या दहा वर्षात खासदार म्हणून अशोक नेते यांनी  लोकोपयोगी कुठले कार्य केले काय..?"

  • खासदार अशोक नेते जनतेच्या प्रश्नांबाबत 'मौनी बाबा'

"खासदार अशोक नेते हे आजवर सर्वसामान्यांच्या समस्या संसदेत मागण्याऐवजी 'मौनी बाबा' बनले त्यासाठी त्यांना उत्कृष्ट संसद रत्न हा पुरस्कार मिळाला काय असा खोचक टोला देखील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला. देश संकटात आहे आता देशाला वाचविण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वांवर आहे म्हणून येत्या 19 एप्रिल रोजी या हुकूमशाही  सरकारला सत्तेतून पायउतार करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून मतदानाच्या प्रक्रियेतून इंडिया आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्यावे, असे आवाहनही यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.

  • मविआच्या उच्चशिक्षित उमेदवाराचा मतदारसंघाला फायदा होईल!

यावेळी विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनीही भाजपावर टीका केली. "इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान हे अतिशय सज्जन व्यक्तिमत्व असून ते उच्चशिक्षित आहेत. त्यांच्या उच्च शिक्षणाचा फायदा आपल्या मतदारसंघात होणार असून ते संसदेत आपले प्रतिनिधित्व करून समस्या सोडवण्यासाठी तत्पर राहतील. याकरिता त्यांना येणाऱ्या निवडणुकीत संपूर्ण ताकदीने सहकार्य करून विजयी करावे," असे आवाहन थोरात यांनी केले.

 

Web Title: Vijay Wadettiwar slams PM Modi led BJP Govt and promotes Mahavikas Aaghadi candidate Dr Namdeo Kirsan 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.