Video: विलासरावांच्या आठवणी लातूर शहरातून पुसल्या जातील; रवींद्र चव्हाणांच्या विधानानं वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 23:33 IST2026-01-05T23:31:47+5:302026-01-05T23:33:12+5:30
इतका द्वेष, इतका तिरस्कार! विलासरावांच्या निधनाला १३ वर्षे झाल्यानंतर त्यांच्या आठवणीही नष्ट व्हाव्यात ही कामना भाजपाने करावी? असा सवाल प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारला आहे.

Video: विलासरावांच्या आठवणी लातूर शहरातून पुसल्या जातील; रवींद्र चव्हाणांच्या विधानानं वाद
लातूर - राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहिलेले विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूर शहरातून पुसल्या जातील यात शंका नाही असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले आहे. चव्हाण यांचं हे विधान सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यात काँग्रेसनेही रवींद्र चव्हाण यांच्या विधानाचा निषेध करत भाजपावर जोरदार पलटवार केला आहे.
काँग्रेसने त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय की, स्व. विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूर जिल्ह्यातून पुसू शकणारा अजून कोणी निर्माण नाही झाला. अनेक जण इच्छा बाळगून आलेत आणि स्वाभिमानी लातूरकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिलीय. विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्ह्याला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली, त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य लातूरच्या विकासासाठी समर्पित केलं. आज त्यांच्याबद्दल हे सत्तेचा माज असलेले भाजपा नेते लातूरात येऊन बरळून जातात की साहेबांच्या आठवणी पुसल्या गेल्यात. त्यांना काय समजणार विलासराव देशमुख यांचं लातूरशी असलेलं नातं. लातूरच्या कर्तुत्वसंपन्न सुपुत्राचा अपमान लातूरकर कधीही सहन करणार नाही. भाजपवाल्यांनो याद राखा, करारा जवाब मिलेगा असं त्यांनी म्हटलं आहे.
तसेच इतका द्वेष, इतका तिरस्कार! विलासरावांच्या निधनाला १३ वर्षे झाल्यानंतर त्यांच्या आठवणीही नष्ट व्हाव्यात ही कामना भाजपाने करावी? विलासरावांचे स्थान केवळ लातूर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे. ते कधीही पुसले जाऊ शकणार नाही. द्वेष तिरस्कार पसरविणाऱ्या अनेक संघटना, अनेक नेते आले पण इतिहासाच्या पानात काळ्या अक्षरांत त्यांची नोंद झाली. जनतेने केवळ सद्विचारांना डोक्यावर घेतले आहे. त्यामुळे गांधीजींचा कितीही तुम्ही द्वेष केलात तरी त्यांच्या पुतळ्यासमोर तुम्हाला झुकावे लागते. भाजपा नेत्यांनी स्वतःचे भविष्य काय ते ओळखावे असं सांगत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी रवींद्र चव्हाणांवर टीका केली आहे.
काय म्हणाले रवींद्र चव्हाण?
लातूर येथे कार्यकर्ता मेळाव्यात भाषणाची सुरुवात करताना भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भारतमाता की जय, वंदे मातरम अशा घोषणा दिल्या. या घोषणा दिल्यानंतर ते म्हणाले की, खरंतर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यावर लक्षात येते, १०० टक्के विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील यात काही शंका नाही असं त्यांनी म्हटलं.