वाकवली शाळेचा देशात डंका, 'पीएम श्री'मध्ये झाली निवड; कोकणातील सरकारी शाळेचा राष्ट्रीय सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 17:07 IST2025-07-30T17:06:51+5:302025-07-30T17:07:01+5:30
कोकणातील सव्वाशे वर्षे जुनी शाळा

वाकवली शाळेचा देशात डंका, 'पीएम श्री'मध्ये झाली निवड; कोकणातील सरकारी शाळेचा राष्ट्रीय सन्मान
दापोली : तालुक्यातील वाकवली क्रमांक १ शाळेची केंद्र सरकारच्या ‘पीएम श्री शाळा’ योजनेंतर्गत देशातील सर्वोत्तम शाळांमध्ये निवड झाली आहे. या ऐतिहासिक यशामुळे वाकवली गावाचे नाव देशपातळीवर उजळले आहे.
सन १८९६ मध्ये ब्रिटिश काळात स्थापन झालेली ही शाळा आधुनिक तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण उपक्रम व दर्जेदार शैक्षणिक सुविधा, यामुळे आजही शिक्षण क्षेत्रात अग्रेसर मानली जाते. पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण देणाऱ्या या शाळेची निवड ‘पीएम श्री’ योजनेसाठी निवड होणे, हे ग्रामीण भागातील सरकारी शाळांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
या निवडीबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे व शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी शाळेचे कौतुक केले आहे. या यशानिमित्त मुख्याध्यापक जावेद शेख, माजी मुख्याध्यापक विलास तांबे, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती यांचा जिल्हा नियोजन समिती सदस्य नीलेश शेठ, गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच प्रणाली धुमाळ, उपसरपंच राजेंद्र तांबे, ग्रामपंचायत सदस्य, समिती अध्यक्ष दुर्गेश जाधव, उपाध्यक्ष समीर कुरेशी उपस्थित होते. लवकरच नवी दिल्लीत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते शाळेला ‘पीएम श्री’चा सन्मान प्रदान केला जाणार आहे.