"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 08:29 IST2025-11-18T08:24:58+5:302025-11-18T08:29:48+5:30
उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यात जवळीक वाढल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरण्याचं कारण नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या राष्ट्रीय प्रश्नांवर लढवल्या जात नाहीत असं उद्धवसेनेने म्हटलं.

"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
मुंबई - गुंडगिरी, झुंडशाही, पैशांचा अतिरक्त वापर, पोलीस बलाचा अतिरक्त करून निवडणूक यंत्रणाच ‘हायजॅक’ करण्याचा भाजपवाल्यांचा डाव मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार आहे. अशा वेळी कोण कोणाच्या विचारांचा हा डाव न खेळता एकत्र येणे व लढणे हाच मार्ग आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हा एकोपाही दिसला होता, तेव्हा काँग्रेसने सबुरीने घ्यावे. पळत्याच्या मागे लागून उपयोग नाही. काँग्रेसने स्वबळाचा निर्णय घेतलाच तर तो त्यांचा निर्णय असेल. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एक आहोत. राज ठाकरे यांच्या आगमनाने मुंबईत मराठी एकजुटीला बळ मिळणार आहे. काँग्रेसने काय करायचे हा त्यांचा प्रश्न असं सांगत उद्धवसेनेने काँग्रेसला शालजोडे हाणले आहेत.
सामना अग्रलेखातून उद्धवसेनेने काँग्रेसच्या स्वबळावर महापालिका निवडणूक लढण्याचा समाचार घेतला आहे. मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढवण्याची घोषणा काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाने केली. बिहारच्या निकालानंतर काँग्रेस पक्षात जो आत्मविश्वास निर्माण झाला त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. काँग्रेस हा एक स्वतंत्र पक्ष आहे. महाविकास आघाडीतला तो एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्षाचा बाणा त्यांना अधूनमधून दाखवावा लागतो. मुंबई महानगरपालिका स्वतंत्रपणे लढवण्याची घोषणा हा त्यांचा स्वतंत्र विषय आहे. शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येत आहेत हे काँग्रेसचे म्हणणे आहे. मनसे हा पक्ष इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीत नसल्याने काँग्रेस राज ठाकरेंची हातीमिळवणी करू शकत नाही. राज ठाकरे सोबत आल्यास काँग्रेसला ‘फटका बसेल’ असे काँग्रेसला वाटत आहे. बिहारच्या निवडणुकीत शिवसेना किंवा राज ठाकरे नव्हते तरीही काँग्रेसचा दारूण पराभव झाला, याबाबत मुंबईकर काँग्रेसवाल्यांचे काय म्हणणे आहे? असा प्रश्न उद्धवसेनेकडून विचारण्यात आला आहे.
सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे
उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यात जवळीक वाढल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरण्याचं कारण नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या राष्ट्रीय प्रश्नांवर लढवल्या जात नाहीत. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी तर आहेच, पण देशाचीही आर्थिक राजधानी आहे. मुंबईचे मराठीपण, मुंबईची ताकद कमी करण्यासाठी भाजपा पुरस्कृत बिल्डर लॉबी शर्थीने कामाला लागली आहे. अशावेळी मुंबईच्या रक्षणासाठी सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
लढाई मुंबईची, महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे हे निदान मराठी बाण्याच्या काँग्रेसवाल्यांनी लक्षात घेतले पाहिजे. काँग्रेस पक्षाने समविचारी पक्षांशी युती करण्याची भूमिका मांडली. आता हे समविचारी कोण, ज्यांना ज्यांना संविधान हाती घेऊन भाजपाच्या भ्रष्ट, हुकुमशाही प्रवृत्तीचा पराभव करायचा आहे ते आमच्या दृष्टीने समविचारी आहेत. काँग्रेसला मुंबईत भाजपा आणि त्यांच्या अदानी संस्कृतीचा पराभव करायचा आहे की नाही?
मुंबई काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी काँग्रेसच्या संस्कृतीचा जो लेखाजोखा मांडला त्यात चुकीचे काहीच नाही, पण संविधानाची चिंता फक्त काँग्रेसला आहे व इतर पक्ष आड्याला तंगड्या लावून बसले आहेत असेही नाही. निवडणूक आयोगाने लोकशाही आणि संविधानाची हत्या केली. मतांच्या चोरीची प्रकरणे बाहेर पडली. याबाबत निघालेल्या प्रचंड मोर्चात राज ठाकरे यांचा सक्रीय सहभाग होता. स्वत: काँग्रेससह समस्त डावे उजवेही आंदोलनात सहभागी झाले होते. वास्तविक डावे अधिक कडवट असतात, पण त्यांनीही राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या सहभागाबाबत आक्षेप घेतल्याचे दिसत नाही.
मुंबईतील राष्ट्रीय काँग्रेस पुढाऱ्यांच्या मनात स्वतंत्र विचार का यावेत, उत्तर भारतीय आणि मुस्लीम मतदार आमच्यापासून दुरावतील अशी भीती काँग्रेसला वाटते, लोकसभा आणि विधानसभेत मुस्लीम समाजाने महाविकास आघाडीला मतदान केले. उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात जात धर्म न पाहता जी मदत केली, त्यामुळे मुस्लीम मतदान शिवसेनेला झाले. काँग्रेसला कितीही भीती वाटली तरी हे मुस्लिमांचे मतदान शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या पारड्यात पडत राहील असा आत्मविश्वास आमच्या मनात पक्का आहे.
काँग्रेसनं मुंबईतील मुस्लीम, उत्तर भारतीयांची चिंता करू नये. मराठी म्हणून ते आपल्या पाठीशी ठाम उभेच राहतील. फक्त त्यांना आत्मविश्वास देणे गरजेचे आहे. भाजपाच्या झुंडशाहीच्या वरवंट्याखाली हा समाज रगडला जात आहे. धारावीतून ज्यांना विस्थापित व्हावे लागत आहेत त्यात हिंदी भाषिक आणि मुस्लीम आहे ते भाजपाची पालखी वाहणार आहेत? अजिबात नाही. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यामुळे हा समाज शंभर टक्के काँग्रेसच्या पाठीशी जाईल हे मनोरथ कदापि पूर्ण होणार नाही.
मुंबईत तुम्ही स्वतंत्र लढणार, मग इतर सत्तावीस महापालिकांचे काय? तेथेही तुमची एकला चलो रे भूमिका राहणार आहे काय? तसे दिसत नाही. शहापणा यातच आहे की महाराष्ट्र धर्म म्हणून सर्व मराठी जनांनी एकत्र यावे व भाजपाच्या अदानीशाहीविरुद्ध एल्गार पुकरावा. महाराष्ट्राचे हित त्यातच आहे. काँग्रेसने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जो अवसानघात केला तो यावेळी करू नये.
राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय विचार सध्या दिल्लीच्या खुंटीला टांगून ठेवा आणि मराठी बाण्याचे जे पक्ष एकत्र येत आहेत त्यांची गोळाबेरीज करून मुंबई महापालिकेवर मराठी माणसांचा भगवा कसा फडकेल याचाच विचार करावा. मराठी जनभावनेच्या विरोधात जाणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही.