निष्ठा सिद्ध करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसैनिकांनी घेतली पीर बाबर शेख दर्ग्यात शपथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 12:47 IST2024-12-09T12:34:21+5:302024-12-09T12:47:54+5:30
लोकसभेपाठोपाठ विधानसभेलाही कोकणात ठाकरेंच्या उमेदवाराचा पराभव जिव्हारी लागल्याने विनायक राऊतांच्या उपस्थितीत पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली होती.

निष्ठा सिद्ध करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसैनिकांनी घेतली पीर बाबर शेख दर्ग्यात शपथ
रत्नागिरी - नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा कोकणात धुव्वा उडाला. कोकणातील सर्व जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी बाजी मारली. रत्नागिरी, राजापूर या मतदारसंघातही ठाकरेंचे उमेदवार पराभूत झाले. त्यामुळे पक्षातील अंतर्गत बैठकीत पदाधिकाऱ्यांमधील वाद उफाळून आला. लोकसभेत याठिकाणी विनायक राऊत यांचा नारायण राणेंनी पराभव केला त्यानंतर विधानसभेतही पक्षाला फटका बसला. त्यामुळे विनायक राऊतांनी पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. यात पक्षातील वाद चव्हाट्यावर आला. त्यातच ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी पक्षावरील निष्ठा सिद्ध करण्यासाठी थेट दर्गा गाठला.
कोकणात शपथ घेण्याला फार महत्त्व असते, एखाद्या प्रसिद्ध मंदिरात, जागृत देवस्थान किंवा ग्रामदेवतेकडे जाऊन शपथ घेतली जाते. यात ठाकरेंच्या शिवसैनिकांनी पीर बाबर शेख दर्गा गाठून तिथे पक्षातील निष्ठेची शपथ घेतली त्यामुळे ते चर्चेत आले आहेत. आपण चुकीचं काम केले नाही. पक्षाचा विश्वासघात केला नाही असा या कार्यकर्त्यांचा दावा होता. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा देवासमोर शपथ घेण्याचं ठरले त्यात ठाकरेंचे कार्यकर्ते पीर बाबर शेख दर्ग्यात गेले आणि त्यांनी तिथे निष्ठेची शपथ घेतली. मात्र यावेळी जिल्हाप्रमुख आणि सहजिल्हाप्रमुख गैरहजर असल्याचं समोर आले.
नेमकं काय झालं?
लोकसभेपाठोपाठ विधानसभेलाही कोकणात ठाकरेंच्या उमेदवाराचा पराभव जिव्हारी लागल्याने विनायक राऊतांच्या उपस्थितीत पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. त्यात काही पदाधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाली. त्यावेळी नेत्यांसमोरच पदाधिकारी एकमेकांवर धावून गेले. पक्षातील संघटन मजबूत राहावे आणि विरोधी काम करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचं बैठकीत ठरले. त्यात काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाशी असलेली निष्ठा सिद्ध करण्यासाठी हातिस येथे जाऊन शपथ घेऊया असं म्हटलं. त्यानंतर तालुका कार्यकारणीतील बहुतांश पदाधिकारी हातिस येथे पोहचून पीर बाबर शेख दर्ग्यात जात शपथ घेतली.
दरम्यान, उबाठाचा खोटा हिंदुत्ववादी बुरखा फाटला आहे. रत्नागिरीत उबाठाच्या कार्यकर्त्यांना निष्ठेची शपथ घ्यायला जागृत मंदिर दिसले नाही का? असा सवाल करत शिवसेना आमदार निलेश राणे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.