अंबरनाथमधील ‘ते’ १२ नगरसेवक अखेर भाजपात, काँग्रेसनं केली होती निलंबनाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 13:56 IST2026-01-08T13:49:03+5:302026-01-08T13:56:03+5:30
Ambernath Municipal Corporation :अंबरनाथमध्ये भाजपासोबत आघाडी करण्याचा निर्णय़ घेणाऱ्या काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी पक्षाकडून निलंबनाची कारवाई झाल्यानंतर थेट कमळ हाती घेत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत नवी मुंबई येथील एका कार्यक्रमादरम्यान, या नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला.

अंबरनाथमधील ‘ते’ १२ नगरसेवक अखेर भाजपात, काँग्रेसनं केली होती निलंबनाची कारवाई
मुंबईजवळच्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगर परिषदेमध्ये भाजपा आणि काँग्रेस यांच्यात आघाडी झाल्याचं वृत्त आल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर अशी आघाडी होणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. तर काँग्रेसनेहीभाजपासोबत आघाडीचा निर्णय घेणारे स्थानिक नेते प्रदीप पाटील यांच्यासह १२ नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली होती. दरम्यान, या कारवाईनंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर आता काँग्रेसच्या या १२ नगरसेवकांनी थेट कमळ हाती घेत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांच्या उपस्थितीत नवी मुंबई येथील एका कार्यक्रमादरम्यान, या नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
काँग्रेस सोडून भाजपामध्ये आलेल्या अंबरनाथमधील नगरसेवकांमध्ये अंबरनाथमधील स्थानिक नेते प्रदीप नाना पाटील यांचाही समावेश आहे. प्रदीप पाटील यांच्यासह दर्शना उमेश पाटील, अर्चना चरण पाटील, हर्षदा पंकज पाटील, तेजस्विनी मिलिंद पाटील, विपुल प्रदीप पाटील, मनीष म्हात्रे, धनलक्ष्मी जयशंकर, संजवणी राहुल देवडे, दिनेश गायकवाड, किरण बद्रीनाथ राठोड आणि
कबीर नरेश गायकवाड यांचा समावेश आहे.
दरम्यान, प्रदीप पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपासून अंबरनाथमधील काँग्रेस पक्षाचं नेतृत्व केलं होतं. त्यामुळे त्यांच्यासह या १२ नगरसेवकांनी निलंबनाच्या कारवाईनंतर थेट भाजपामध्ये प्रवेश करणं हा अंबरनाथमधील काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.