"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 17:54 IST2025-08-07T17:53:38+5:302025-08-07T17:54:58+5:30
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बोगस मतदारांचे पुरावे सादर केले. राहुल गांधी यांच्या या आरोपांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली.

"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मतांची चोरी झाली. लोकसभा निवडणुकीनंतर पाच महिन्याच्या कालावधीत अनेक मतदार नोंदवले गेले. एकाच व्यक्तीचे नाव अनेक ठिकाणी असल्याचे राहुल गांधींनी पुरावे दाखवले. राहुल गांधींच्या या आरोपावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टीका केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
माध्यमांशी बोलताना एकनात शिंदे म्हणाले, "मी एवढंच सांगतो की, जेव्हा ते हरतात... आता बिहारच्या निवडणुकांमध्ये ते हरणार आहेत. याचा अंदाज आता त्यांना लागलेला आहे. त्यामुळे हे सगळं रडगाणं सुरू आहे. एक परिस्थिती तयार करण्याचे काम सुरू आहे", अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेतेपदावर राहुल गांधींवर केली.
मनमोहन सिंग सरकारच्या काळात सगळ्यात मोठा स्कॅम -शिंदे
शिंदे पुढे बोलताना म्हणाले, "ते म्हणतील की, 'आम्ही म्हणालो होतो की, हे असं असं चाललेलं आहे. यामध्ये घोटाळा झाला. मतदानामध्ये चोरी केली.' मी एवढंच म्हणेल की, त्यांच्या काळात सगळ्यात मोठा निवडणूक आयोगामध्ये झालेला घोटाळा मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात मोठा स्कॅम... मनमोहन सिंग सरकारमध्ये निवडणूक आयोगाच्या प्रमुखांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मतदानाचा अधिकार सहा वर्षांसाठी काढून घेतला होता. किती मोठा स्कॅम होता."
"तुम्हाला काय अधिकार आहे आमच्यावर आरोप करण्याचा. तुम्हाला काय अधिकार आहे मत चोरी म्हणण्याचा. जेव्हा हे हरतात, तेव्हा निवडणूक आयोग, ईव्हीएम या सगळ्यावर आरोप करतात. राहुल गांधी यांचा हा करंटेपणा आहे. राहुल गांधी यांना निवडणुकीचं, मतांचे आणि विरोधी पक्षनेतेपदाचे भान असायला पाहिजे", असे टीकास्त्र शिंदेंनी राहुल गांधींवर डागले.
शिंदेंनी सांगितले वाढलेल्या मतांचे कारण
"हे केवळ निवडणूक आयोगाचा अपमान करत नाहीयेत. तर हा कोट्यवधी लाडक्या बहिणी, कोट्यवधी शेतकऱ्यांचा अपमान आहे. महाराष्ट्रातील तमाम जनतेचा अपमान आहे. एक लाख १८६ बूथ महाराष्ट्रात आहेत. एका बूथवर ७० मतांचं मतदान जास्त झाले, तर ७० लाख मते जास्त होतात. लाडकी बहीण योजना केल्यानंतर सर्वांनी ठरवलं की महायुतीला विजयी करायचं. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढला आणि हे ते मान्य करायला तयार नाहीत. राहुल गांधी फेक नरेटिव्ह पसरवण्याचे काम करत आहेत. जबाबदार विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी काम केले पाहिजे", असे एकनाथ शिंदे म्हणाले.