‘नेतृत्वाविरोधात टीका किती सहन करायची याला मर्यादा’, वरुण सरदेसाईंनी सुनावले, मविआतील वाद वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 08:32 PM2024-03-28T20:32:19+5:302024-03-28T20:33:09+5:30

Varun Sardesai Criticize Congress leaders: सांगलीच्या जागेवरून आक्रमक भूमिका घेतलेले काँग्रेसचे नेते ठाकरे गटावर टीका करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर वरुण सरदेसाई यांनी विश्वजित कदम यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांना इशारा दिला आहे. 

There's a limit to how much criticism you can tolerate against leadership, Varun Sardesai tells Vishwajit Kadam and Satej Patal | ‘नेतृत्वाविरोधात टीका किती सहन करायची याला मर्यादा’, वरुण सरदेसाईंनी सुनावले, मविआतील वाद वाढणार?

‘नेतृत्वाविरोधात टीका किती सहन करायची याला मर्यादा’, वरुण सरदेसाईंनी सुनावले, मविआतील वाद वाढणार?

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाने सांगलीमधून चंद्रहार पाटील यांना दिलेल्या उमेदवारीवरून ठाकरे गट आणि काँग्रेसचे नेते सध्या आमने सामने आलेले आहे. सांगली हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने तो आपल्यालाच मिळावा, असा काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांचा आग्रह आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटाने सांगलीतून चंद्रहार पाटील यांना थेट उमेदवारी जाही केल्याने काँग्रेसची कोंडी झाली आहे. दरम्यान, सांगलीच्या जागेवरून आक्रमक भूमिका घेतलेले काँग्रेसचे नेते ठाकरे गटावर टीका करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर वरुण सरदेसाई यांनी विश्वजित कदम यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांना इशारा दिला आहे. 

सांगलीच्या जागेसाठी विश्वजित कदम आणि सतेज पाटील यांच्यासह स्थानिक नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना वरुण सरदेसाई म्हणाले की, मला जेवढी कल्पना आहे त्यानुसार विश्वजित कदम आणि सतेज पाटील हे वाटाघाटीच्या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांना कदाचित अपुरी माहिती असेल. कोल्हापूरची जागा वर्षांनुवर्षे शिवसेनेच्या हक्काची जागा होती. २०१९ मध्येही आम्ही येथून विजय मिळवला होता. यावेळी स्वत: शाहू महाराज छत्रपती हे तिथून लढत असल्याने आम्ही कोल्हापूरऐवजी सांगलीची जागा घेतली. त्यामुळे कुणीही असं विधान करू नये शेवटी शिवसैनिक म्हटल्यावर आमच्या नेतृत्वाविरोधात किती टीका सहन करायची, यालाही मर्यादा आहेत, असे वरुण सरदेसाई यांनी सुनावले.

महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून असलेला तणाव वगळता इतर सर्वकाही व्यवस्थित असल्याचेही त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीमध्ये सगळं व्यवस्थित आहे. बाळासाहेब थोरात किंवा शरद पवार यांच्यावर बोलण्याएवढा मी काही मोठा नाही. पण मी एक सांगू इच्छितो की, ज्या शिवसेनेच्या पारंपरिक जागा होत्या. त्यापैकी जागावाटपामध्ये ज्या जागा आम्हाला मिळालेल्या आहेत. त्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांची घोषणा केली आहे. आता महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांचा मान राखत असताना काही कार्यकर्त्यांना वाटत असतं की, अमूक जागा आपल्याला हवी आहे. मात्र तो त्या त्या पक्षाच्या आणि त्या पक्षामधील नेत्यांचा प्रश्न आहे.  अशा विषयात त्यांच्या पक्षाचं नेतृत्व त्यांच्या स्थानिक नेत्यांची मनधरणी करतील, अशी आम्हाला खात्री आहे, असा विश्वास वरुण सरदेसाई यांनी व्यक्त केला.  

महाविकास आघाडी म्हणून, इंडिया आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहोत. नुकतीच राहुल गांधी यांची सभा झाली तेव्हा सर्वजण एकत्र होते. महाविकास आघाडीमध्ये अत्यंत उत्तम वातावरण आहे. एखाद दुसरा मतदारसंघ सोडता जवळपास सगळीकडे आम्ही एकत्र आलो आहोत. पहिल्यांदाच आघाडी होतेय, म्हटल्यावर ह्या गोष्टी होणारच, असेही ते म्हणाले. 

Web Title: There's a limit to how much criticism you can tolerate against leadership, Varun Sardesai tells Vishwajit Kadam and Satej Patal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.