"युतीला मिळालेलं यश एक गोष्ट स्पष्ट करते, ती म्हणजे...", अमित शाहांची महापालिका निवडणुकीनंतर खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 19:22 IST2026-01-16T19:20:25+5:302026-01-16T19:22:59+5:30
Amit Shah on Municipal election Result 2026: नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीनंतर भाजपाने महापालिका निवडणुकीतही दणदणीत विजय मिळवला आहे. विशेषतः भाजपाने मुंबई महापालिका निवडणुकीवर भगवा फडकावला असून, हे मोठे यश आहे.

"युतीला मिळालेलं यश एक गोष्ट स्पष्ट करते, ती म्हणजे...", अमित शाहांची महापालिका निवडणुकीनंतर खास पोस्ट
Maharashtra Municipal Election Results 2026: मुंबईसह राज्यातील बहुतांश महापालिकांमध्ये सत्ता मिळवण्यात, सत्तेपर्यंत मजल मारण्यात भाजपा यशस्वी ठरली आहे. भाजपाने काही ठिकाणी स्पष्ट बहुमत मिळवले असून, काही ठिकाणी मित्रपक्षाच्या मदतीने ते सत्ता मिळवताना दिसत आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीतही भाजपाने चांगली कामगिरी केली असून, या निकालानंतर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह यांनी खास पोस्ट करत अभिनंदन केले आहे.
सगळ्यांचे लक्ष असलेल्या मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी निवडणूक पार पडली. यात दोन ठिकाणी भाजपाने शिंदेसेनेला सोबत घेतले आहे. या दोन्ही ठिकाणी भाजपाने आपला दबाब सिद्ध केला असून, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, पुणे, पिंपरी चिंचवड या महत्त्वाच्या महापालिका निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे.
अमित शाह महापालिका निवडणूक निकालावर काय बोलले?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर एक पोस्ट केली आहे.
शाह यांनी म्हटले आहे की, "महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीला मिळालेलं प्रचंड यश एक गोष्ट स्पष्ट करते, ती म्हणजे आज देशातल्या काना-कोपऱ्यातील जनतेचा विश्वास फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील NDA सरकारच्या विकासाच्या धोरणावरच आहे", अशा भावना शाह यांनी व्यक्त केल्या आहेत.
फडणवीस, शिंदेंसह पक्षाच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन
"हे ऐतिहासिक यश म्हणजे महाराष्ट्रातील महायुती सरकारने विकास आणि जनकल्याणाच्या केलेल्या कार्यांवर जनतेने उमटवलेली पसंतीची मोहोरच. या प्रचंड समर्थनाबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेचे मनापासून आभार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आणि भाजपा-शिवसेनेच्या सर्वच कार्यकर्त्यांचं या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन", अशा शब्दात शाह यांनी नेते आणि कार्यकर्त्यांची पाठ थोपाटली आहे.
मुंबई महानगर प्रदेश, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात या सगळ्याच प्रदेशातील महापालिका निवडणुकांमध्ये भाजपाने दबदबा कायम ठेवला आहे. या निवडणूक निकालामुळे भाजपा कार्यकर्त्यांचा हुरूप आणखी वाढला असून, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत याचा फायदा होईल, अशी चर्चा होत आहे.