राज्याला खरा धोका पवार-ठाकरे कुटुंबीयांचा, मंत्री आशिष शेलार यांचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 18:51 IST2025-09-20T18:50:59+5:302025-09-20T18:51:40+5:30
शिराळ्यात भाजपचा कार्यकर्ता मेळावा

राज्याला खरा धोका पवार-ठाकरे कुटुंबीयांचा, मंत्री आशिष शेलार यांचे टीकास्त्र
शिराळा : शहरी नक्षलवादी व महाराष्ट्रावर बेगडी प्रेम असणारे पवार व ठाकरे कुटुंबीय यांना महाराष्ट्राची माती, सण, परंपरा, संस्कृती, महामानव यांच्याबद्दल प्रेम नाही. त्यांना फक्त राजकारण करायचे आहे. राज्याला खरा धोका त्यांच्यापासून आहे, अशी टीका माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली.
येथील एका मंगल कार्यालयात शेलार यांचा सत्कार तसेच भाजपा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी आमदार सत्यजीत देशमुख, आमदार सदाभाऊ खोत, मकरंद देशपांडे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, चिमण डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शेलार म्हणाले की, उद्धव ठाकरे किंवा पवार यांच्या कुटुंबीयांनी कधी हिंदूंचे वटपौर्णिमा, हरितालिका, बैलपोळा, महाशिवरात्री आदी सण साजरे करताना आपण पाहिले आहेत का? प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपती मूर्तींमुळे नदीचे प्रदूषण होत असल्याने आलेली गणेश मूर्तीवरील बंदी हे पापही काँग्रेसचेच आहे. या लोकांना सण, परंपरा संस्कृतीशी काहीही देणेघेणे नाही.
सत्यजीत देशमुख म्हणाले, शिराळा येथील गोरक्षनाथ मंदिर येथे कुंभमेळ्यानंतर येणाऱ्या झुंडीवेळी परिसराचा विकास महाराष्ट्र सरकारमार्फत होईल. शिराळा येथे खुले व बंदिस्त सभागृह व्हावे. या तालुक्यातील काही भागात मोबाइल रेंज नाही.
सम्राट महाडिक म्हणाले, हा जिल्हा नाट्यपंढरी म्हणून ओळखला जातो. येथील कलाकारांना योग्य दिशा व मार्गदर्शन मिळत नाही. येथील कलाकारांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र उभारावे.
सदाभाऊ खोत म्हणाले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पठ्ठे बापूराव अशी अनेक मोठी माणसे तालुक्यात होऊन गेली. मात्र, त्यांच्या नावे कोठे सभागृह नाही की स्मारक. वाळवा तालुक्यात एका व्यक्तीशिवाय दुसऱ्या कोणाचे नाव द्यायचे नाही, असे जणू ठरले आहे.
यावेळी सी. बी. पाटील, संपतराव देशमुख, हणमंतराव पाटील, के. डी. पाटील, बाळासाहेब पाटील, जयसिंगराव शिंदे, सुखदेव पाटील, रणजीतसिंह नाईक, सम्राट शिंदे, अनिता धस, संगीता साळुंखे, संभाजी नलवडे, विकास देशमुख, घनश्याम पाटील, जयराज पाटील, बाजीराव शेडगे उपस्थित होते.