'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 06:55 IST2026-01-01T06:52:24+5:302026-01-01T06:55:05+5:30
ताकद बंडखोरांची : २,८६९ जागांसाठी ३३,६०६ उमेदवारी अर्ज, छत्रपती संभाजीनगरात ११५ जागांसाठी १,८७० अर्ज, अनेक नाराज झाले अपक्ष...

'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिका निवडणुकीची उमेदवारी न मिळाल्यामुळे संतप्त झालेले पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दुसऱ्या दिवशीही राडा सुरूच ठेवला. नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे, राज ठाकरेही मैदानात उतरले आहेत. डॅमेज कंट्रोल करण्यासाठी दिवसभर वरिष्ठ नेत्यांची फोनाफोनी सुरू होती. राज्यातील २९ महापालिका निवडणुकांसाठी २,८६९ जागांसाठी तब्बल ३३,६०६ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, किती जण माघार घेतात अन् कोणाचे अर्ज बाद होतात, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांचे वाहन रोखून त्यावर काळा रंग फासण्याचा प्रयत्न केला. काही संतप्त कार्यकर्त्यांनी सावे व कराड यांचे फोटो फाडले. आमचे तिकीट का कापले, सर्व्हे कोणी बदलला, मंत्र्यांच्या पीएच्या घरी उमेदवारी कशी दिली, असा सवालही नाराजांनी केला. खा. डॉ. भागवत कराड यांच्या वाहनाला घेराव घालून शिवीगाळ केली. कराड यांच्या वाहनाच्या बोनेटवर हात आपटून कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. नाराज प्रशांत भदाणे यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेत जाळून घेण्याचा प्रयत्न केला. इच्छुक महिलेने एका पदाधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली. हा सगळा प्रकार पाहता दोन्ही नेत्यांना कार्यालयातून निघून जावे लागले. दुसऱ्या दिवशीही सकाळचा प्रहर महिलांचे उपोषण, शिवीगाळ, आरोप, आक्रोश, रडारडीचाच होता.
भाजप नेते, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी किचनमध्ये सर्व्हे करून उमेदवाऱ्या दिल्या का? असा सवाल संतप्त कार्यकर्ते करत होते.
पतीच्या बंडखोरीमुळे रुसलेल्या माजी महापौर गेल्या माहेरी -
नागपूर : माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर यांनी प्रभाग १७मधून भाजपचे तिकीट न मिळाल्याने पक्ष सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला व बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला. त्यानंतर अर्चना डेहनकर यांनी थेट भावाचे घर गाठले. निवडणुकीत मी भाजपचा प्रचार करणार असल्याने एकाच घरात परस्परविरोधी भूमिका नको म्हणून हे पाऊल उचलल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पहिली लढाई : नाराजांची मनधरणी
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी
महापालिका निवडणुकीत भाजपची डोकेदुखी बंडखोरांनी अनेक ठिकाणी वाढविली असल्याचे चित्र असताना बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपासून पुढाकार
घेतला आहे.
मुंबईत ठाकरेबंधुंच्या पक्षांमध्येही काही प्रभागात बंडखोरी व नाराजी उफाळून आली आहे. नाराजी शमविण्यासाठी उद्धवसेना व मनसेचे नेते त्यांची समजूत घालणार आहेत.
नाशिक : दोनपेक्षा जास्त उमेदवारांना एबी फॉर्मने गोंधळ -
महापालिका निवडणुकीसाठी अर्ज छाननीच्या शेवटच्या दिवशी भाजप, शिंदेसेनेसह उद्धवसेनेच्या वतीने दोनपेक्षा जास्त उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आल्याने गोंधळ उडत हमरीतुमरीचा ही प्रकार घडला. प्रभाग क्रमांक १८, २४, २५ व २६, ३० मध्ये डबल एबी फॉर्म दोनदा दिल्याचा प्रकार उघडकीस आल्याने पक्षाची मोठी कोंडी झाली आहे.
नियमानुसार एका प्रभागात एकाच उमेदवाराची उमेदवारी ग्राह्य धरली जाणार असल्याने, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत काही उमेदवारांचे एबी फॉर्म अवैध ठरविले आहेत.
‘भाजप’च्या एबी फॉर्मचा मुद्दा; लीगल नोटीस
सोलापूर : भाजपने दुपारी तीन वाजल्यानंतर म्हणजे अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर एबी फॉर्म जमा केल्याचा आरोप महाविकास आघाडी आणि शिंदेसेनेने केला आहे. यासंदर्भात मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी व सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांना विरोधकांनी लीगल नोटीस दिली आहे.
भाजपचे तीन, शिंदेसेनेचे दोन ‘एबी फॉर्म’ बाद -
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या तीन आणि शिंदेसेनेच्या दोन उमेदवारांचे ‘एबी फॉर्म’ उमेदवारी अर्जासोबत वेळेत न दिल्याने बुधवारी छाननीवेळी बाद झाले. विशेष म्हणजे शिंदेसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या ‘होमपीच’वर म्हणजे प्रभाग क्रमांक २४ मध्येच त्यांना अनपेक्षित झटका बसला आहे. एबी फॉर्म बाद झाल्यामुळे पाचही उमेदवारांना आता अपक्ष म्हणून रिंगणात उतरावे लागेल.