मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीत मतभेद; श्रीरंग बारणेंना NCP आमदाराचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 14:55 IST2024-03-02T14:54:41+5:302024-03-02T14:55:25+5:30
पक्ष जो काही निर्णय देईल तो मानणारा कार्यकर्ता आहे. जोपर्यंत आम्हाला आमची भूमिका मांडता येईल. आम्हाला ही जागा मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न करतोय असं त्यांनी म्हटलं.

मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीत मतभेद; श्रीरंग बारणेंना NCP आमदाराचा विरोध
पुणे - लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. कुठल्याही क्षणी निवडणूक जाहीर होऊ शकते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष सज्ज झालेत. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागावाटपही अंतिम टप्प्यात आहे. मात्र काही मतदारसंघावरून अद्याप वाद आहेत. महायुतीतील मावळ मतदारसंघावर शिवसेना-राष्ट्रवादीने दावा सांगितला आहे. त्यात आता राष्ट्रवादी आमदार सुनील शेळके यांनी उघडपणे शिवसेनेच्या विद्यमान खासदारांना विरोध दर्शवला आहे.
श्रीरंग बारणे हे शिवसेनेचे असले तरी ऐनवेळी ते कमळाच्या चिन्हावरही लढू शकतात अशी चर्चा सुरू आहे. त्यात बारणेंना उमेदवारी देऊ नका अशी मागणी आमदार सुनील शेळकेंनी केली आहे. आमदार सुनील शेळके म्हणाले की, मावळ तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी म्हणून माझ्या मतदारसंघातील जी लोकभावना आहे ती मांडण्याचा माझ्या पक्षाकडे प्रयत्न केलेला आहे. पिंपरी चिंचवड, मावळ, कर्जत, पनवेल याठिकाणी राष्ट्रवादीची ताकद मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये अनेक नगरसेवक राष्ट्रवादीसोबत आहेत. मी युतीचा धर्म पाळणारा कार्यकर्ता आहे. पक्ष जो काही निर्णय देईल तो मानणारा कार्यकर्ता आहे. जोपर्यंत आम्हाला आमची भूमिका मांडता येईल. आम्हाला ही जागा मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न करतोय असं त्यांनी म्हटलं.
तसेच ३ महिन्यापासून स्पष्टपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमचे नेते अजित पवार यांना मावळची जागा राष्ट्रवादीला आली पाहिजे ही मागणी करतोय. मावळची जागा मावळ तालुक्याला मिळावी. आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर मावळला कधीही लोकसभेची संधी मिळाली नाही. त्यामुळे आम्हाला ही जागा मिळावी आमचा उमेदवार तयार आहे असंही सूचक वक्तव्य आमदार सुनील शेळकेंनी केले.