विचारधारा सोडल्याने राष्ट्रवादी, उद्धवसेनेत फूट, आमदार विनय कोरे यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 18:19 IST2025-09-29T18:17:43+5:302025-09-29T18:19:08+5:30
मिरजेत जनसुराज्य शक्ती पक्षाचा मेळावा

विचारधारा सोडल्याने राष्ट्रवादी, उद्धवसेनेत फूट, आमदार विनय कोरे यांची टीका
मिरज : धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली, मताचे राजकारण करणारा काँग्रेस व राष्ट्रवादी हा पक्ष व हिंदुत्वाचे नाव घेऊन राजकारण करणारा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी उद्धवसेना या पक्षांनी सत्तेसाठी आपली विचारधारा सोडल्याने या पक्षात फूट पडल्याची टीका आमदार विनय कोरे यांनी केली. मिरजेत आयोजित जनसुराज्य पक्षाच्या राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा व गौरव स्त्री शक्तीचा या कार्यक्रमात जनसुराज्य पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे हे बोलत होते.
महाराष्ट्राच्या राजकारणात निष्कलंक काम करणारा जनसुराज्य पक्ष आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती भक्कमपणे निवडणूक लढवेल. जागावाटपही योग्य प्रकारे होईल. जेथे एकापेक्षा अनेक पक्षाचे उमेदवार इच्छुक असतील त्याठिकाणी राज्यस्तरावरील नेते वाटाघाटी करून योग्य तो निर्णय घेतील, असेही आमदार विनय कोरे यांनी यावेळी सांगितले.
जनसुराज्य पक्ष सर्वसामान्य लोकांचा, गोरगरीब व दीनदलितांचा पक्ष आहे. राज्यात एक ताकदवान पक्ष म्हणून जनसुराज्य पक्ष ओळखला जातो. जनसुराज्य पक्ष राज्यात वेगवेगळ्या स्तरावर काम करत आहे, असे सांगून आमदार अशोक माने पुढे म्हणाले, कार्यक्षम युवानेते समित कदम यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन वाढत आहे.
सांगली जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीतील पदाधिकारी जनसुराज्य पक्षात येत आहेत. जनसुराज्य पक्ष हा चांगला पर्याय म्हणून पुढे येत आहे, असे सांगून जनसुराज्य युवा शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम पुढे म्हणाले, जातिभेद न करता विकासाच राजकारण करणारा जनसुराज्य पक्ष आहे. सांगली जिल्ह्यात १०० कोटींपेक्षा जास्त विकासनिधी मिळवून दिला आहे. मिरजेत निखिल कलगुटगी यांच्या बाबत दुर्दैवी घटना घडली. कलगुटगी कुटुंबीयांच्या मागे आम्ही ठाम उभे आहोत, असेही समित कदम यांनी यावेळी सांगितले.
जनसुराज्य युवा शक्तीचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा पार पडला. यावेळी आमदार अशोकराव माने, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब कदम, ज्येष्ठ नेते महादेव कुरणे, अमित कदम, आनंदा देवमाने, आनंदसागर पुजारी, पंकज म्हेत्रे, विजय माने, समीर मालगावे, जयश्रीताई कुरणे, अनिताताई कदम, मोनिका माळी, तमन्ना सतारमेकर, ज्योती मोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.